नाशिक शहराला महानगरपालिका असली तरी अद्याप स्वतंत्र वाहतूक व्यवस्था नाही. यापार्श्वभूमीवर नाशिक पालिकेसाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था निर्माण करणार असल्याची ग्वाही तुकाराम मुंढे यांनी दिली. नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाचा कारभार शुक्रवारी मुंढे यांनी स्विकारला, यावेळी घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंढे म्हणाले, नाशिक शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी नवी वाहतुक व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. यापूर्वी नवी मुंबई आणि पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रमुखपदावर काम पाहिले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये त्याचा निश्चित फायदा होईल. नाशिक शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. पार्किंगचा प्रश्न हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या अंतर्गत येत असल्याने त्यासाठी नवे पार्किंग धोरण ठरवावे लागणार आहे. ते अस्तित्वात नसेल तर निर्माण करु, त्याचबरोबर रस्त्यावरील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ऑन रोडपेक्षा ऑफरोड पार्किंगला प्रधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी नवे पार्किंगच्या जागा विकसित केल्या जातील. तसेच रस्त्यावरील पार्किंग टाळण्यासाठी याचे दर अधिक ठेवण्यात येतील, असे मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नाशिक शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मुंढे म्हणाले, पालिकेच्या सफाई कामगारांनी वेळेवर कामावर गेले पाहिजे, तसेच सर्व परिसर स्वच्छ केला पाहिजे. यासाठी निरिक्षकांना त्यांच्या कामाची पाहणी करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. रस्त्यावरील सफाईचे मी देखील अधूनमधून निरीक्षण करणार आहे. त्याचबरोबर शहरातील कचराकुंड्या ओसंडून वाहणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. कमीत कमी कचरा शिल्लक रहावा यासाठी कचरा विलगीकरणाला प्रधान्य देण्यात येणार आहे. शहर स्वच्छ रहावे यासाठी दुकानदारांनी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या वापरल्यास कारवाई करण्यात येणार आहे. शहर घाण करण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे बिन बसवण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर, जनतेच्या हिताच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असून संवेदनशीलतेसह पारदर्शकता जपण्यात येईल. जनतेच्या सोयीसाठी अधिकाधिक ऑनलाईन सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. नाशिक शहरातील अतिक्रमणांबाबत बोलताना ते म्हणाले, आजच शहरातील दुकाने, हॉटेल्स यांची पाहणी करणार असून नवे अतिक्रम होऊ दिले जाणार नाही. तसेच शहरातील गरज नसलेल्या प्रकल्पांवर अभ्यास करुन निर्णय घेणार आहे.

पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत बोलताना मुंढे म्हणाले, आपापल्या विभागामध्ये कुठल्याही प्रकारची कामे प्रलंबित राहणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. तसेच जे कर्मचाराी चांगले काम करतील त्याला माझे १०० टक्के संरक्षण असेल. मात्र, जो चुकीचे काम करेन त्याला शिक्षा भोगावी लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. विशेष म्हणजे आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी घेतलेल्या एका बैठकीत अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्याने गणवेश परिधान न करता हजेरी लावल्याने मुंढेंनी त्याला बैठकीतून बाहेर काढले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती भरली आहे.