News Flash

ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईच्या झळा

टँकरसाठी आतापर्यंत ५१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पिण्याच्या पाण्यासाठी ५१ विहिरींचे अधिग्रहण, ४८६ गाववाडय़ांना १२२ टँकरने पाणी

वातावरण गारव्याने भारलेले असतानाच दुसरीकडे पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. जिल्ह्य़ातील १२३ गावे आणि ३६३ वाडय़ांना सध्या १२२ टँकरने पाणी पुरवले जात आहे. हिवाळ्यात दोन लाख ६६ हजार ६३६ इतकी लोकसंख्या टँकरवर अवलंबून आहे. आताच ही परिस्थिती तर उन्हाळ्यात काय या चिंतेने आताच संबंधितांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. टँकरसाठी आतापर्यंत ५१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

पाऊसमान कमी राहिल्याने धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा होऊ शकला नाही. परिणामी, काही भागात पावसाळा संपुष्टात येत नाही, तोच टंचाईचे संकट भेडसावू लागले. जसा काळ पुढे सरकत आहे, तसे पाणी टंचाईचा परिघ विस्तारत आहे. जानेवारीच्या अखेरीस टंचाईग्रस्त गावांची संख्या १२३ गावे आणि ३६३ वाडय़ांवर पोहोचली आहे. त्यांना शासकीय २० तर १०२ खासगी अशा एकूण १२२ टँकरद्वारे पाणी पुरविले जात असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. सिन्नरमध्ये सर्वाधिक ३१ टँकर सुरू आहेत. तेथील १५ गावे आणि १६६ वाडय़ांना टँकरने पाणी दिले जाते. येवला तालुक्यात ४५ गावे आणि २९ वाडय़ांना टँकरने पाणी द्यावे लागत आहे. बागलाण तालुक्यात २५ गावे, दोन वाडय़ा, चांदवडमध्ये दोन गावे, एक वाडी, देवळ्यात सहा गावे, दहा वाडय़ा, मालेगावमध्ये २० गावे, ६६ वाडय़ा, नांदगावमध्ये १० गावे, ८९ वाडय़ा असे हे प्रमाण आहे.

दिंडोरी, इगतपुरी, कळवण, नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या तालुक्यात अद्याप टँकरने पाणी देण्याची वेळ आलेली नाही.

आठ तालुक्यांत आधीच दुष्काळ जाहीर झाला आहे. पावसाळ्यात केलेली लागवड फळास येऊ शकली नाही. शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले. दुष्काळामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. दुष्काळाचे सावट गडद होत असून प्रशासनाने पाच तालुक्यात गावांसाठी २५ तर टँकरसाठी २६ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २३ विहिरींचे अधिग्रहण झाले आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठय़ावर मोठा निधी खर्ची पडतो. तात्पुरत्या स्वरुपाचा हा उपाय असून त्यात यंत्रणेला बराच रस असतो. परिणामी, कायमस्वरुपी उपायांकडे दुर्लक्ष होते. टँकर सुरू करण्यापूर्वी संबंधित गावात तात्पुरत्या स्वरुपात पाणी देण्यासाठी काय उपाय करता येतील याचा विचार करण्यास शासनाने आधीच सांगितले आहे. विहिरींचे अधिग्रहण करून काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला जात आहे. जानेवारीत टंचाईची ही स्थिती असल्याने उन्हाळ्यात या संकटाने गंभीर स्वरूप धारण करू नये म्हणून यंत्रणेची धावपळ सुरू आहे. शासकीय उपाय योजनांसोबतच लोकसहभागातून विहिरीतील गाळ काढणे, विहिरीची खोली वाढविणे. कूपनलिका, विहीर खोदणे, पाण्याचे आवर्तन सोडणे, विहिरीत आडव्या कूपनलिका घेणे आदी उपायांवर विचार विनिमय सुरू आहे.

तालुकानिहाय विहीर अधिग्रहण (एकत्रित)

बागलाण सहा

देवळा पाच

मालेगाव २३

नांदगाव १३

सिन्नर तीन

येवला एक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2019 12:32 am

Web Title: winter water shortage in nashik
Next Stories
1 खादीला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न
2 ओळखपत्रावर ‘मी अवयवदाता आहे’चा संदेश छापा
3 थंडीचा सर्वाधिक काळ मुक्काम
Just Now!
X