ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर जबाबदारी सोपविणार

जिल्ह्य़ातील काही दुर्गम भागात आजही इंटरनेटची सुविधा नाही. अशा भागातील ६९ मतदान केंद्रांवरील माहिती प्राप्त होण्यात अडचणी येतात. यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतदेखील उपरोक्त केंद्रांच्या परिसरातील माहिती प्राप्त करण्यासाठी प्रशासन पोलीस यंत्रणेकडील बिनतारी संदेश यंत्रणेची मदत घेणार आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून जिथे जुळणी मिळते तिथून मतदानाबाबतची माहिती देण्याचे काम ‘रनर्स’ करतील. त्यासाठी स्थानिक ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी अशा व्यक्तींवर रनर्सची जबाबदारी सोपविली जाणार आहे.

जिल्ह्य़ातील पेठ, कळवण, सुरगाणा तालुक्यातील दुर्गम भागात ६९ मतदान केंद्रांवर रनर्सची मदत घेण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. मतदानाच्या दिवशी हे रनर्स मतदानाची माहिती देण्याचे काम करतील. जिल्ह्य़ात १५ विधानसभा मतदारसंघ असून ४५७९ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या केंद्रातील चार हजार ५१३ केंद्रे इंटरनेटच्या माध्यमातून जोडली गेली आहेत. यामुळे या केंद्रावरील मतदानाची माहिती तत्परतेने मिळू शकते. जिल्ह्य़ातील दुर्गम भागातील केंद्रे जुळणीअभावी इंटरनेटने जोडण्यात अवरोध येतात. अशा केंद्रांवर लोकसभा निवडणुकीप्रमाणे रनर्सची संकल्पना राबविली जाणार आहे.

उपरोक्त भागातील स्थानिक तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक अशा व्यक्तींची रनर्स म्हणून मदत घेतली जाईल. त्यांच्याकडे पोलीस विभागाचे बिनतारी संदेश यंत्रणा दिली जाईल. जेणेकरून संबंधित रनर्स हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहतील. मतदान केंद्रापासून ज्या भागात नेटवर्क असेल तिथे रनर्सला थांबविले जाईल. मतदान केंद्रावरील माहिती ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची धुरा सांभाळतील.

उपरोक्त भागात भ्रमणध्वनी वा अन्य काही संपर्क साधन नसल्याने या संकल्पनेचा उपयोग अनुचित प्रकार रोखण्यात होईल. त्या केंद्रावर तसा काही प्रकार घडलाच तर तिथे मदत पोहोचविण्याच्या कामात रनर्सची मदत होईल असे प्रशासनाला वाटते.

लोकसभा निवडणुकीत संबंधित केंद्रावरील माहिती प्राप्त करण्यासाठी ही संकल्पना राबविली गेली होती. तो यशस्वी झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. दुर्गम भागातील मतदानाची माहिती मिळवण्याची भिस्त रनर्सवर राहणार आहे.