लोकसभ निवडणुकीतील पराभवामुळे चंद्रकांत खैरे काहीही बरळत असून आपण कोणती जमीन बळकावली हे खैरे यांनी सिध्द करावे, असे आवाहन भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.

येथील भाजप कार्यालयात रविवारी दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खैरे यांच्यासह नागरिकत्व सुधारीत कायदा, बेळगाव प्रश्न, राज्यातील महाविकास आघाडीचा कारभार याविषयी मत मांडले. दानवे यांच्यावर खैरे यांनी जमीन बळकावल्याचा आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी आपण राजूर संस्थानचे सचिव असल्याने खैरे यांनी आपले नाव घेऊन आरोप करावेत, असे आवाहन केले. नागरिकत्व सुधारीत कायद्यामुळे नाराज भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या २२ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याविषयी आपणास काहीही माहिती नाही. हा कायदा नागरिकत्व देण्याचा असून कोणाचे नागरिकत्व हिरावून घेण्याचा नाही. भाजपच्या अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांनाही हा कायदा काय आहे ते माहिती आहे. केंद्राचे जम्मू काश्मीरकडे विशेष लक्ष असून बुधवारी आपण जम्मू काश्मीरला जाणार आहेत. स्थानिकांशी चर्चा करून त्यांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेणार असून त्याची माहिती सरकारला दिली जाईल. काश्मीरमध्ये ज्या योजना राबविणे बाकी आहे, त्या राबविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत आहेत. पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीवेळी २४ टक्के हिंदू होते. त्यांची संख्या आता केवळ तीन टक्के झाली आहे. बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हां २३ टक्के हिंदू होते. आता केवळ सात टक्के हिंदू राहिले आहेत. मग इतके हिंदू गेले कुठे, असा प्रश्नही दानवे यांनी उपस्थित केला.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा ‘अमर अकबर अँथनी’ असा उल्लेख करून हे सरकार फार दिवस टिकणार नाही, असा दावा करून शिवाजी महाराजांच्या वंशजांचा प्रश्न उपस्थित करून जनतेची दिशाभूल करू नये, असेही त्यांनी सांगितले. अर्जुन खोतकर यांनी आपणावर थेट आरोप केलेले नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. बेळगाव प्रश्न सुटला पाहिजे, अशीच भाजपचीही मागणी असल्याचे दानवे यांनी नमूद केले.