१० दिवसात दररोजची रुग्णसंख्या १० च्या आत

मालेगाव : पाच महिने करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे धास्तावलेल्या मालेगावकरांना ऑक्टोबर महिन्यात लक्षणीयरित्या घटलेल्या रुग्णसंख्येमुळे हायसे वाटण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. १० दिवसांपासून शहरात रोज केवळ एक आकडी रुग्णसंख्या आढळून येत असून १५ दिवसांत करोनामुळे एकही मृत्यू नोंदवला गेला नसल्याचे समाधानकारक चित्र आहे.

एप्रिल आणि मे महिन्याच्या पूर्वार्धात पुणे, मुंबई, ठाणे शहरानंतर राज्यात सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आल्याने मालेगाव हे उत्तर महाराष्ट्रातील करोनाचे केंद्र बनले होते. करोना संसर्गाला पोषक भौगोलिक वातावरण असणाऱ्या या मुस्लीमबहुल शहराची करोनाच्या विळख्यातून कशी मुक्तता होईल, अशीच चिंता सर्वांना सतावत होती. आठ एप्रिल रोजी सर्वप्रथम पाच रुग्ण आढळून आल्यानंतर दिवसागणिक रुग्ण संख्येत वाढ होऊन महिन्याभरात ती चारशेच्या घरात गेली. दोन महिन्यात ही रुग्णसंख्या आठशेपार झाली होती. त्यानंतर परिस्थितीत सुधारणा होऊ लागली. जून महिन्यापासून नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले. शेजारच्या नाशिकसह राज्यातील अन्य शहरांमध्ये रुग्ण संख्या झपाटय़ाने वाढत असताना मालेगावातील स्थिती नियंत्रणात आल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे ‘मालेगाव प्रारूप‘चे सर्वत्र कौतुक सुरू झाले. मात्र ही स्थिती अल्पजीवी ठरली.

जुलैच्या उत्तरार्धात पुन्हा रुग्णवाढ सुरू झाली. आधीपेक्षा या रुग्णवाढीचे प्रमाण अधिक असल्याने धडकी भरण्यासारखे वातावरण निर्माण झाले. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत कमी अधिक प्रमाणात ही स्थिती कायम होती. या सर्व काळात करोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या काळजी वाढवणारी होती. परंतु, ऑक्टोबर महिन्यात या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत शहरातील करोना बाधितांची एकूण संख्या तीन हजार ९६६ झाली असून मृतांची संख्या १३९ वर पोहोचली आहे. ‘करोना कहर‘मुळे गेली पाच महिने काळजीचे वातावरण असलेल्या मालेगावसाठी ऑक्टोबर महिना सुखद ठरत असल्याचे दिसत आहे.  सद्यस्थितीत शहरातील केवळ ६५ रुग्ण करोना उपचार केंद्रांमध्ये उपचारासाठी दाखल असून १३८ जण गृह विलगीकरणात आहेत.

शहरातील करोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात आलेले उल्लेखनीय यश ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली महापौरांसह शहरातील सर्व लोकप्रतिनिधींनी केलेले सहकार्य तसेच आरोग्य, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, आशा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कष्टाचे हे फळ आहे. येत्या काळात या स्थितीत अधिक सुधारणा होणे अपेक्षित आहे.

– त्र्यंबक कासार (आयुक्त, मालेगाव महापालिका)