मनमाड : महाराष्ट्र एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेची धावत्या रेल्वेमध्ये पर्स खेचून पळणाऱ्या चोरटय़ाचा संबंधित महिलेने पूर्ण क्षमतेने प्रतिकार केला खरा, पण चोराने धावत्या गाडीतून उडी मारली. दरम्यान, संबंधित महिलाही धावत्या गाडीतून पडून गंभीर जखमी झाली. आरती दळवी (६५, कोंढवा, पुणे) असे या महिलेचे नाव आहे. जखमी संशयित आकाश मोरेला (२०, मनमाड) लोहमार्ग पोलिसांनी पकडून मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत हर्षदा दळवी (२४, पुणे) यांनी तक्रार दिली. हर्षदा या १ जानेवारी रोजी आई आरती यांच्यासमवेत एस पाच या आरक्षित बोगीतून अमरावती ते पुणे असा प्रवास करीत होत्या. रात्री नऊ वाजता ही गाडी मनमाड स्थानकातून सुटली. संशयिताने बोगीत शिरून त्यांच्या आईच्या हातात अडकविलेली पर्स जबरदस्तीने ओढली. धावत्या गाडीतून चोरटा खाली उतरत असताना आरती यांनी जोरदार प्रतिकार केला.
पण चोरटय़ाने त्यांनाही ओढल्याने त्या धावत्या गाडीतून खाली पडून जखमी झाल्या. आरडाओरडीमुळे प्रवासी धावून आले. त्यांनी साखळी ओढून गाडी थांबविली. जखमी महिलेस गाडीत बसवून घेतले. धावत्या गाडीत तिकीट तपासनीसाकडे लेखी तक्रार केली. त्यावरून लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 6, 2021 12:25 am