नाशिक : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुखपट्टी लावा, वारंवार हात धुवा असे वारंवार सांगितले जात असले तरी त्याचे काटेकोरपणे पालन होते असे दिसत नाही. देवळाली कॅम्प येथे चोरटय़ांनी या परिस्थितीचा लाभ उठविला. भूलथापा देत प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या नियमांचे महिलेला पालन करायला लावून सोनसाखळी लंपास केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॅम्प रस्त्यावरील बनाचाळ येथील ओम साईराम या इस्त्रीच्या दुकानात ही घटना घडली. याबाबत शादा कनोजिया यांनी तक्रार दिली. कनोजिया यांचे हे दुकान आहे. रविवारी दुपारी त्या दुकानात असताना ४० वर्षांची व्यक्ती आली. आपण छावणी मंडळातील कर्मचारी असल्याची बतावणी संबंधिताने केली. मुखपट्टी लावा, सॅनिटायझरने हात स्वच्छ करा, अशी सूचना करत गळ्यातील सोनसाखळी काढायला सांगितली. साहेबांचे कपडे इस्त्रीसाठी दिले जातील. त्याचे दर कमी ठेवावेत, असा दमही संशयिताने भरला.

तक्रारदार महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवत मुखपट्टी लावत गळ्यातील सोनसाखळी काढली. संशयिताने ती कागदात गुंडाळून देतो, असे सांगितले. कागदात सोनसाखळी गुंडाळून महिलेच्या पर्समध्ये ती ठेवण्याचा बहाणा केला, आणि बेमालूमपणे सोनसाखळी घेऊन चोरटा पसार झाला. काही वेळाने कनोजिया यांनी पर्समधील गुंडाळलेला कागद पाहिला असता त्यात सोनसाखळी नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांना धक्का बसला. त्यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

संशयित चोरटय़ाने १० ग्रॅम वजनाची ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी लंपास केली. महत्त्वाची बाब म्हणजे, चोरी करताना संशयिताने महिलेला करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या नियमांचे पालन करायला लावले. अशा प्रकारे चोरीचा हा पहिलाच प्रकार असल्याचे निदर्शनास येते.