लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सापळा रचून कारवाई 

नाशिक  : घरकुल योजने अंतर्गत घर बांधण्यासाठी अनुदान  मंजूर करण्यासाठी के लेल्या प्रयत्नांच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे पाच हजार रुपयाची लाच महिला सरपंचाने केली.  ही रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सरपंचाला अटक केली.

करोना संकट काळात ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अनेकांना महिना कसा काढता येईल, याची चिंता असतांना समाजातील काही घटक अशा परिस्थितीचा कोणताही विचार न करता के वळ लूट करावी, या उद्देशाने कार्यरत असल्याचे वारंवार दिसते. असाच अनुभव नाशिक तालुक्यातील दरी येथील एका नागरिकास आला. करोना संकटामुळे आधीच आर्थिक परिस्थिती ढासळली असतांना त्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्याकडेच लाच मागण्याचा प्रकार महिला सरपंचाने के ला.  शबरी आवास घरकुल योजने अंतर्गत तक्रारदाराला एक लाख १५ हजार रुपयांचे अनुदान मंजुर झाले. तक्रारदाराचे वडील मयत झाल्याने तक्रारदाराच्या आईच्या नावाने अनुदानापैकी पहिल्या टप्प्यात १५ हजार रुपयांचा धनादेश निघाला.  यावेळी नाशिक तालुक्यातील दरीगांवच्या सरपंच अलका गांगोडे यांनी अनुदान मंजुर करण्यासाठी के लेल्या प्रयत्नाबद्दल तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे व्यथित झालेल्या संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केली असता सत्यता आढळून आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.  दरीगावांतील राहत्या घरी सरपंच गांगोडे या लाच स्वरूपातील रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.