नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू असताना त्यांच्या या प्रयत्नांना साथ देण्यासाठी रविवारी येथील सनविवि फाऊंडेशनतर्फे दुचाकीवरून महिलांची हेल्मेट फेरी काढण्यात आली.
दुचाकी चालकांकडून हेल्मेटचा वापर होणे अत्यंत गरजेचे आहे. हेल्मेटचा वापर करण्यात आलेला नसल्याने अनेक अपघातांमध्ये दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हेल्मेटविषयी दुचाकी चालकांमध्ये जनजागृती करण्याच्या हेतून सनविवि फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने महिलांची दुचाकीवरून हेल्मेट फेरी काढण्यात आली. भोसला सैनिकी महाविद्यालयापासून निघालेल्या या फेरीत शहरातील अनेक महिलांनी सहभाग घेतला. या सर्वानी दुचाकी चालकांना हेल्मेटचा वापर करण्याचा संदेश दिला. महात्मा नगर क्रिकेट मैदानात फेरीचा समारोप झाला. या वेळी ‘मिसेस इंटरनॅशनल वर्ल्डवाइड क्वीन २०१५’ नमिता कोहक यांनी फेरीत सहभाग घेत प्रबोधन केले. वाहतूक शाखा तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचारीही फेरीत सहभागी झाल्या होत्या. या वेळी फाऊंडेशनच्या सोनल नेरे, सोनल मांडगे आदी उपस्थित होत्या.