प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन

नाशिक : जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात टंचाईमुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यावरून वाद होऊ लागले आहेत. सटाणा पालिकेने गेल्या महिन्याभरापासून नळ पाणीपुरवठा केलेला नाही. त्यामुळे महिलांच्या संतापाला मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनाही तोंड द्यावे लागले. सटाणा तहसील कार्यालयात आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनापुढेच महिलांनी ठिय्या दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन महिलांना दिले.

सटाणा शहरात वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महिनाभरापासून पालिकेने नळ पाणीपुरवठाच केला नसल्याने समस्यांमध्ये अधिकच भर पडली आहे.

नगरपालिका सहकार्य करत नसून प्रशासन स्तरावरून नागरिकांना समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत, याचा निषेध नोंदविण्यासाठी महिला सटाणा तहसील कार्यालयावर धडकल्या. जिल्हाधिकारी सूरज मांढरे हे निवडणूक नियोजनासंदर्भात आढावा घेण्यासाठी कार्यालयात आल्याची माहिती महिलांना मिळाल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनासमोर ठिय्या दिला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गिरणा नदीपात्रात चणकापूर धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनावर मालेगावसारख्या मोठय़ा शहरास पाणीपुरवठा होत आहे, मात्र सटाणा शहरात कोणत्याही प्रकारचा पाणीपुरवठा अथवा तसे नियोजन नाही.

उन्हाळा अजून बरेच दिवस राहणार असल्याने या कालावधीत पाणीपुरवठा न झाल्यास नागरिकांचे अधिकच हाल होतील. विकत घेतलेले पाणी प्रचंड महाग असून तेसुद्धा वेळेत उपलब्ध होत नाही. त्यामुळे टँकरमार्फत होणाऱ्या पाणीपुरवठय़ावर शहराची तहान भागू शकत नाही.

पाण्याअभावी साथीचे रोग बळावले असून स्त्रियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बहुसंख्य स्त्रियांना कंबर, पाठ, मानदुखीचे आजार जडले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शहरासाठी पाण्याची त्वरित व्यवस्था करण्यात यावी, तसेच चणकापूर आणि केळझर धरणातील आवर्तनाचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत योग्य कारवाई न झाल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. ठिय्या दिलेल्या महिलांमध्ये भाजप तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सरोज चंद्रात्रे, अ‍ॅड. सुजाता पाठक, अ‍ॅड. स्मिता चिंधडे, अपेक्षा चव्हाण, शहर अध्यक्ष भाजप ज्योती ठाकरे आदींचा समावेश होता.