X

लग्नाचे आमिष दाखवत युवतीवर अत्याचार

गर्भपात करण्यास भाग पाडत जिवे मारण्याची धमकी दिली.

लग्नाचे आमिष दाखवत मुलींना फसविण्याचे प्रकार दिवसागणिक वाढत आहे. शहरातील गंगापूररोड परिसरात राहणाऱ्या २० वर्षीय युवतीवर मुंबई येथील मित्राने लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक अत्याचार केले. ती गर्भवती असल्याचे समजताच संशयिताने तिला गर्भपात करण्यास भाग पाडत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुंबईत दाखल झालेला गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

केटीएचएम महाविद्यालयाच्या मागील परिसरात राहणारी २० वर्षीय युवती मुंबई पोलीस दलात ट्रॅफिक वॉर्डन म्हणून सेवा बजावत असून तिची संशयित सागर वळवी (२२, रा. बोरिवली) याच्याशी भेट झाली. काही महिन्यांपूर्वी ओळखीचे रूपांतर मैत्रीत नंतर प्रेमसंबंधात झाले. यावेळी संशयित सागरने युवतीला लग्नाचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला. १ मे ते १५ ऑगस्ट या कालावधीत संशयिताने बोरिवली येथील घरी तिच्यावर जबरदस्ती केली. नंतर चांदवड तसेच पंचवटीतील लॉज येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

दरम्यानच्या काळात पीडित युवती गर्भवती असल्याचे लक्षात आले. संशयिताने गोड बोलून तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडित युवतीने लग्नाचा आग्रह धरल्याने संशयिताने तिला शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेने बृहन्मुंबई येथे संशयित सागर विरुद्ध तक्रार दिली. हा गुन्हा पंचवटी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Outbrain