सीटू मोर्चात कामगारांसह नेत्यांचा आरोप

सहा महिने कामगारांच्या घरातील चुली बंद राहिल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना पोलीस यंत्रणा मालकांवर कारवाई करण्याऐवजी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या कामगारांवर दडपशाही करीत असल्याचा आरोप करत भारतीय ट्रेड युनियन (सीटू) नेतृत्वाखाली हजारो कामगारांनी उद्योजकांच्या कामगार विरोधी धोरणा विरोधात मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. नॅश समूहाच्या मालकाच्या चिथावणीने पोलिसांनी सीटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड आणि अन्य कामगारांवर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, अनेक कारखान्यांमध्ये सूडबुद्धीने कमी केलेल्या कामगारांना तातडीने कामावर घ्यावे आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. मोर्चात कामगारांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात एकेरी नावाने घोषणाबाजी केली, तर कामगार नेत्यांनी पोलीस, नाशिकचे पालकमंत्री मालकधार्जिणे असल्याचे टीकास्त्र सोडले.

नॅश समूहाच्या कारखान्यात कामगारांमध्ये अंतर्गत वादातून झालेल्या हाणामारीच्या प्रकरणात पोलिसांनी सीटूचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेशी कुठलाही संबंध नसताना त्यात कराड यांचे नाव गोवण्यात आल्याची सीटूची तक्रार आहे. या अनुषंगाने माकपच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले होते. मालकाच्या दबावातून पोलिसांनी दाखल केलेला हा गुन्हा मागे घ्यावा, या प्रमुख मागणीसह अन्य प्रश्नांसाठी बुधवारी सीटूने एक दिवसीय संप पुकारत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला. जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. लाल बावटय़ाचे निशाण घेऊन हजारो कामगार मोर्चात सहभागी झाले. बनावट गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी, किमान वेतन-कामगार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मालकांवर कारवाई करावी आदी मागण्यांचे फलक घेऊन मोर्चेकऱ्यांच्या हातात होते.  (पान ३)

वाहतुकीचा बोजबारा

स्मार्ट सिटीअंतर्गत अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या पट्टय़ात स्मार्ट रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीवर र्निबध आणले जात असताना सीटूच्या भव्य मोर्चाने मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्था सुमारे तीन तास कोलमडली. उपरोक्त कामाची सध्या परिसरात पूर्वतयारी सुरू आहे. त्यात मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर ठाण मांडून सभा घेतली. मोर्चामुळे शालिमार, सांगली बँक सिग्नल, महात्मा गांधी रोड, सीबीएस आदी भागांतील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी लागली. शेकडो वाहनधारक ठिकठिकाणी अडकून पडले. मोर्चेकऱ्यांनी अडकलेल्या वाहनधारकांना बाहेर जाण्यास जागा दिली नाही. कोणी तसा प्रयत्न केल्यास जोरदार घोषणाबाजी केली जात होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेणाऱ्या पोलिसांनी या प्रकारांकडे दुर्लक्ष केले. मोर्चा संपुष्टात आल्यावर साधारणत: अर्धा ते एक तासाने ही कोंडी फुटली.