16 January 2019

News Flash

कामगार मोर्चामुळे उद्योजक वेठीस

उद्योगांना वेठीस धरणाऱ्या सीटू कामगार संघटनेची मान्यता रद्द करा, अशी मागणी नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स (निमा) संस्थेने केली आहे.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांनी आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले.

  • उद्योगांना आर्थिक फटका बसल्याचा आक्षेप
  • सीटूची मान्यता रद्द करण्याची मागणी

तीन ते चार कारखान्यांमधील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भारतीय ट्रेड युनियनने (सीटू) शहर, जिल्ह्य़ातील औद्योगिक वसाहतींना वेठीस धरल्याची प्रतिक्रिया औद्योगिक वर्तुळात उमटली आहे. सीटूच्या मोर्चात हजारो कामगार सहभागी झाल्यामुळे कारखान्यातील उत्पादनावर विपरित परिणाम झाला ्आहे. उद्योगांना वेठीस धरणाऱ्या सीटू कामगार संघटनेची मान्यता रद्द करा, अशी मागणी नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स (निमा) संस्थेने केली आहे.

सीटू युनियनची स्थापना केल्यामुळे मालकांनी सूडबुध्दीने नॅश समूह, क्रॉम्प्टन ग्रीव्हज्, जे. एम. इंजिनिअरिंग, विराज इंजिनिअरिंग आदी कंपन्यांतील कामगारांना कमी केल्याचा सीटूचा आरोप आहे.  सीटूने मोर्चा काढू नये याकरिता निमाने प्रयत्न केले होते. तीन ते चार कारखान्यांशी संबंधित प्रश्न आहे. त्याची सोडवणूक एकत्रितपणे बैठक बोलावून करता आली असती. प्रारंभी, सीटूने सकारात्मक प्रतिसाद दिला. नंतर मोर्चा काढून सर्व उद्योजकांना वेठीस धरल्याचे निमाने म्हटले आहे.

कामगार मोर्चात गेल्याने सीटू संलग्न कारखान्यांतील उत्पादनावर परिणाम झाला. तीन ते चार कारखान्यांच्या प्रश्नांसाठी सीटूने सर्व उद्योगांना वेठीस धरले. कारखाने सुरू असले तरी कंत्राटी कामगारांवर त्यांची भिस्त राहिली. त्याची परिणती उत्पादन घटण्यात होईल. सर्व उद्योगांना नाहक वेठीस धरणाऱ्या सीटूची मान्यता रद्द करावी, अशी मागणी निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी केली. नवीन उद्योग आणण्यासाठी निमा प्रयत्नशील आहे. त्यात उद्योजक-कामगार यांच्यात मतभेद वाढत असल्याचा गुंतवणुकीवर फारसा परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सूचित केले.

सुमारे दीड हजार उद्योजकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (आयमा) आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी सीटूला धारेवर धरले आहे. उद्योजक संघटना नवीन उद्योगांनी गुंतवणूक करावी म्हणून प्रयत्न करीत आहे. सीटूसारख्या संघटनांच्या भूमिकेमुळे औद्योगिक विश्वात नाशिकची प्रतिमा मलिन होत असल्याकडे आयमाचे माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी लक्ष वेधले. कामगारांचे प्रश्न चर्चेद्वारे कायद्याच्या चौकटीत सोडविता येतात. एखाद्या नेत्यावरील गुन्हा मागे घ्यावा की नाही हे न्यायालयात निश्चित होईल. त्याकरिता शासकीय यंत्रणांवर दबाव आणणे अनूचित असल्याचा मुद्दा उद्योजक मांडत आहेत.

समन्वय समिती स्थापना करा

एकीकडे मार्क्‍सवादी कम्युनिस्टसह सर्वजण नाशिकच्या औद्योगिक विकासाच्या गप्पा मारतात. परंतु, दुर्दैवाने जेव्हा उद्योग विकासाची वेळ येते, त्यावेळी अशा पद्धतीचे आंदोलन किंवा संप पुकारून नाशिकची प्रतिमा देशात मलिीन करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे नाशिकमध्ये नवीन गुंतवणूक येण्यासाठी सर्व स्तरावर होणारे प्रयत्न तोकडे पडतात. सर्वपक्षीय कामगार संघटना, औद्योगिक संघटना यांनी एकत्रितरित्या चर्चा करून असे प्रश्न सोडवायला हवेत. नाशिकची प्रतिमा मलीन होणार नाही याची सर्वानी दक्षता घेतल्यास भविष्यात नाशिकमध्ये गुंतवणुकीला चालना मिळेल.

धनंजय बेळे  (माजी अध्यक्ष, आयमा)

First Published on June 7, 2018 1:29 am

Web Title: worker morcha in nashik entrepreneur nashik