शेतकरी संप काळात शेतकरी आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत तसेच मोनियर रुफिंग कारखान्यातील कामगारांना मारहाण करणाऱ्या वाडिवऱ्हे पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी सिटू संघटनेच्यावतीने विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कार्यालयासमोर शेकडो कामगारांनी ठिय्या दिल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करावी लागली.

इगतपुरीच्या वाडिवऱ्हे येथील मोनियार रुफिंग कारखान्यातील कामगारांना किमान वेतनही मिळत नाही. कायद्यानुसार कोणत्याही सवलती नाहीत. यामुळे आपले कायदेशीर हक्क मिळावे म्हणून सर्व कामगारांनी सिटू संघटनेचे नेतृत्व स्वीकारले. त्यामुळे व्यवस्थापनाने दोन वर्षांपासून कामगारांना कामावर घेणे बंद केले. पण, कारखाना बंद ठेवला नाही. कामगारांना कारणे दाखवा नोटीस बजावत दडपशाही सुरू ठेवल्याची सिटूची तक्रार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कामगारांकडून हमीपत्र घेऊन त्यांना कामावर घेण्याचे व कामावर घेतल्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. परंतु, कारखाना मालकाने कामगारांना कामावर घेतले नाही. यामुळे त्यांनी उपोषण सुरू केले. यादरम्यान वाडिवऱ्हे पोलिसांनी सिटूचे जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे व इतर २२ कामगारांविरुद्ध गुन्हे दाखल करत १७ जणांना अटक केली. वाडिवऱ्हे पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामगारांना जबर मारहाण केली. न्यायालयात मारहाण केल्याचे सांगितल्यास पुन्हा मारहाण करू, अशी धमकी दिल्याचे सिटूने विशेष पोलीस महानिरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. वाडिवऱ्हे पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कारखाना व्यवस्थापक यांनी संगनमताने कामगारांवर अमानुष अत्याचार केला. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याची तक्रार सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केली.

कामगारांना विवस्त्र करून मारहाण करणाऱ्या व भ्रमणध्वनीत त्याचे चित्रण करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, संबंधितांना निलंबित करावे, कंपनी व्यवस्थापकाला अटक करावी, कामगारांवर दाखल खोटे गुन्हे मागे घ्यावेत तसेच शेतकरी संपाच्या काळात आंदोलक शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.