पहिल्या टप्प्यातील गावांतील कामे तीन वर्षांपासून रखडलेली

नाशिक : सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात निवडलेल्या गावात तीन वर्षे लोटूनही अनेक कामे रखडलेली असताना स्थानिक खासदारांनी आता निवडणुकीपूर्वी दुसऱ्या टप्प्यातील गावे आदर्श करण्याची धडपड सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात ही योजना रेंगाळली असताना दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक खासदार आणखी दोन गावे आदर्श कशी करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा

खासदारांनी मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन त्याचा कायापालट करावा, या उद्देशाने केंद्र सरकारने सांसद आदर्श ग्राम योजनेची संकल्पना मांडली. पाच वर्षांच्या कार्यकाळात प्रत्येक खासदाराने तीन गावे आदर्श करावीत, असे अभिप्रेत आहे. लोकसभा निवडणुकीआधी किमान दुसऱ्या गावाचे काम प्रगतिपथावर असावे, असा प्रत्येकाचा प्रयत्न दिसतो. धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्य़ातील दोन तालुके समाविष्ट होतात.

पहिल्या टप्प्यात धुळ्यातील गोंदूरची निवड करणाऱ्या डॉ. भामरे यांनी दुसऱ्या टप्प्यात सटाणा तालुक्यातील साल्हेरची निवड केली आहे. या गावाचा आराखडा तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असून जूनअखेपर्यंत त्यास ग्रामसभेची मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात डॉ. भामरे हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव मंत्री. त्यांनी आधी निवडलेल्या गोंदूरमध्ये ग्राम विकास आराखडय़ात दोन कोटी ३६ लाखांची एकूण ५१ कामे निश्चित केली होती. त्यातील २८ कामे पूर्ण झाली असून २३ कामे रखडलेली आहेत. पाच हजार लोकसंख्येच्या गोंदूरमध्ये सव्वा कोटीच्या निधीतून जलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली, परंतु हा प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही. ग्रामस्थांना मीटरद्वारे शुद्ध पाणी मिळणार आहे. त्याकरिता नळजोडणी घेणे बंधनकारक आहे. ग्रामस्थांनी पाठ फिरवल्याने ही योजना अमलात आलेली नाही. अपघात टाळण्यासाठी दुतर्फा संरक्षक भिंत, गटारी, अमरधाममध्ये सुविधा, लघुसिंचन बंधाऱ्यांची उभारणी, पूर संरक्षक भिंत अशी काही कामे झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.

दिंडोरीचे भाजपचे खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी पहिल्या टप्प्यात अवनखेड गावाची निवड केली होती. आदर्श ग्राम योजनेंतर्गत अवनखेडमध्ये काही सुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरी शिवार, वस्ती रस्त्यांची ग्रामस्थांची मागणी अपूर्ण आहे. संबंधित रस्त्यांच्या काही कामांना प्रशासकीय मान्यता मिळूनही निधीच मिळालेला नाही. परिणामी, रस्त्यांची कामे रखडल्याचे अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव सांगतात. कर्जमाफी योजनेमुळे मागील वर्षी जिल्हा नियोजन आराखडय़ात ३० टक्के कपात झाली होती. त्याची झळ गावातील कामांना बसली. गावात जल शुद्धीकरण प्रकल्प, आरोग्य उपकेंद्र, व्यायामशाळा आणि अंगणवाडीची उभारणी झाली आहे. तंबाखू, गुटखा विक्री बंद झाली. चार शेतकरी बचत गटांची स्थापना, २६० शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे माती परीक्षण दृष्टिपथास आले. सौर प्रणाली आधारित दुहेरी पंप योजना, सौर पथदीपांची उभारणी झाली. ग्राम विकास आराखडय़ात ६० पैकी ३२ कामे आतापर्यंत पूर्ण झाली. तांत्रिकदृष्टय़ा अयोग्य असल्याने चार कामे रद्द करावी लागली. पाच कामे प्रगतिपथावर असून १९ कामे रखडलेली आहेत. त्यात अधिक्याने शेत शिवारातील रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. या कामांचा अंतर्भाव करण्याची तजवीज नसल्याने ती कोणत्या शीषर्काखाली करायची, हा प्रशासनासमोर पेच आहे. विद्यमान खासदारांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यास वर्षभराचा अवधी बाकी आहे. अशातच दुसऱ्या टप्प्यात सुरगाण्यातील माळगव्हाणची त्यांनी निवड केली. यापूर्वी लालफितीच्या कारभारात उपलब्ध काळात प्रत्येकी तीन गावे आदर्श होणे अवघड असल्याने दुसऱ्या टप्प्याच्या बळावर संबंधितांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

अंजनेरीतही अडचणींचा डोंगर

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खा. हेमंत गोडसे यांनी दुसऱ्या टप्प्यात निवडलेल्या सांजेगावचा ग्राम विकास आराखडा मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंजनेरीची निवड केली होती. ग्राम विकास आराखडय़ात पर्यटनदृष्टय़ा विकास करण्यासाठी निश्चित केलेल्या १२१ पैकी ४६ कामे तीन वर्षांत पूर्ण झाली. चार कामे प्रगतिपथावर असून ७१ कामे संबंधित विभागांकडे योग्य त्या कार्यवाहीसाठी प्रस्तावित करण्यात आली आहे. गावात जनजागृतीसाठी सौर पथदीपाच्या खांबावर ध्वनिक्षेपक यंत्रणा बसविण्याचे नियोजन होते. उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी भोंगे बसविण्यास बंदी घातल्याने या कामावर फुली मारावी लागली. भक्त निवास, शौचालय उभारण्याचे काम जागा नसल्याने करता आले नाही. डिजिटल अंगणवाडी, ग्रामसचिवालय इमारत, रस्ते काँक्रिटीकरणाची काही कामे, सौर पथदीप, क्रीडा संकुल, दिशादर्शक फलक आदी कामे झाली. पेय जल योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. डोंगरावर लोकसहभागातून औषधी वनस्पती लागवड, बांबू लागवड, वृक्षारोपण करावयाचे होते. परंतु अंजनेरी परिसरातील काही क्षेत्र वन संरक्षित असल्याने ती कामे बारगळल्याचे अधिकारी सांगतात.