जागतिक पर्यावरण दिन विशेष

नाशिक : जैवविविधतेने संपन्न असलेल्या जिल्ह्य़ातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘रामसर’ दर्जा प्राप्त झाला. परंतु, हा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी वनविभागासमोर स्थानिक, प्रशासकीय अडथळे ओलांडण्याचे आव्हान आहे. करोनामुळे लागु असलेल्या टाळेबंदीची त्यात भर पडत आहे. निधीच्या अभावामुळे प्रश्नांची गुंतागुंत वाढत असून वनविभाग यातून पर्यटन आणि वनसंवर्धनाच्या दृष्टीने कसे मार्ग काढतात, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा जागर होत असतांना स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणींचा विचार होणे गरजेचे आहे. नांदुरमध्यमेश्वर अभयारण्याच्या बाबतीत हे ठळकपणे समोर येते. नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य परिसराला रामसर दर्जा प्राप्त झाला आहे. अभयारण्य परिसरात तीन हजाराहून अधिक विविध प्रजातीचे पक्षी आहेत. हिवाळ्यात परदेशी पाहुण्या पक्ष्यांचा मुक्काम असतो. पक्षी निरीक्षण, त्यांचा चिवचिवाट ऐकण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी येतात. यंदा मात्र करोनामुळे लागु असलेल्या टाळेबंदीने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. दुसरीकडे, वनविभागाने मिळालेला हा निवांत वेळ रामसरच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांसाठी वापरण्याचे ठरविल्यावर स्थानिक प्रश्नांचा ससेमिरा त्यांच्या पाठीमागे लागला आहे. अभयारण्य म्हणून विकसित होत असतांना अद्याप अभ्यारण्याच्या सिमारेषा ठरलेल्या नाहीत. त्यामुळे अभयारण्यालगत असलेल्या चापडगावसह अन्य ११ गावातील शेतकरी अभयारण्यातील धरणालगत असलेल्या जमिनीवर, गाळपेरावर आपला हक्क सांगत आहेत. राजकीय दबावामुळे या प्रश्नाला भिडणे वन विभागाला जड जात असतांना लोकप्रतिनिधी, नागरिकांशी समन्वय साधत प्रश्न सुटावा यासाठी वनविभाग प्रयत्न करत आहे. पाणथळ जागेत अनेक जण मासेमारी करण्यासाठी येतात. अपुऱ्या मनुष्यबळामुळे या सर्व हालचालींवर लक्ष ठेवणे अशक्य असल्याने काही ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवतात. मासेमारीमुळे येथील पक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याने वनविभाग अशा संशयितांवर कारवाईचा बडगा उगारत आहे. दुसरीकडे, जिथे पोहचता येणार नाही, लक्ष देणे अशक्य आहे, अशा परिसरात ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे अभयारण्य परिसरात दाखल होणाऱ्या स्थानिकांची संख्या कमी नाही. त्यांच्यासाठी ‘ट्रेस पास’ असला तरी याचा गैरफायदा काही मंडळीकडून घेतला जातो. हा प्रश्न सुटावा यासाठी वनविभाग काम करत आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे, अभयारण्य परिसरात धरण असून या धरणाला गोदावरीचे पाणी मिळते. परंतु, नाशिक महापालिका हद्दीतून या ठिकाणी दुषित पाणी येत असल्याने जलपर्णीने परिसर व्यापला जातो. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने पक्षी, पाण्यातील मासे यांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. याबाबत नाशिक महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्याशी चर्चा सुरू असून आवश्यक पाऊले उचलण्यास सुरूवात झाली असल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक भरत शिंदे यांनी दिली. अडचणी, त्यावर उपाय यावर कृती आराखडा तयार करत काम सुरू असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. असे असले तरी करोनामुळे कामाचा वेग मंदावला असून पर्यटक येत नसल्याने महसुलात घट झाली आहे. केंद्रिय विभागाकडून आवश्यक निधी अद्याप प्राप्त न झाल्याने कामे खोळंबली आहेत. अडथळ्यांची शर्यत वनविभाग कशी पार पाडणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.