विद्यार्थ्यांसह लोकप्रतिनिधी, अधिकारी सामूहिक योग शिबिरात सहभागी

नाशिक : योग प्रार्थनेने गुरुवारची सकाळ शहरासह जिल्ह्य़ात उजाडली. योगदिनाचे औचित्य साधत आबालवृद्धासह, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी सामूहिक योग शिबिरात सहभागी होत योगाचे प्रात्यक्षिक केले. शाळा परिसरात चिमुकल्यांनीही योग प्रात्यक्षिकात सहभाग घेत वेगवेगळ्या कसरती केल्या. सकाळ सत्रातील योगाचा उत्साह दुपारनंतर मावळला. दुपारच्या सत्रात योग दिनाचे सोपस्कार छायाचित्र काढण्यापुरता मर्यादित राहिले.

जिल्हा परिसरात जागतिक योग दिनाचे औचित्य साधत शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, संघटना यांच्या वतीने योगदिनानिमित्त योग शिबीर, प्रात्यक्षिके करण्यात आली.  शिक्षण विभागाच्या वतीने योग दिनासाठी सूत्रबद्ध नियोजन करत जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यास सांगण्यात आले होते. गुरुवारी त्यानुसार दोन्ही सत्रातील शाळा एकाच वेळी भरल्याने दोन तासाहून अधिक वेळ जिल्हा परिषद, नाशिक महापालिकेच्या शाळांमध्ये योगाचा तास सुरू राहिला. यानंतर दैनंदिन अभ्यासास सुरुवात झाली.

दुसरीकडे खासगी शाळांमध्ये मैदानाची कमतरता, पावसामुळे मैदानात झालेला चिखल पाहता सामुहिक पातळीवर शाळांचा योगाभ्यास करण्याकडे कल राहिला. रोटरी क्लब ऑफ नाशिक, सूर्या फाऊंडेशनसह अन्य काही सामाजिक संस्थांनी शाळांना सामूहिक योग शिबिरात सामावून घेतले. नाशिकरोडसह अन्य ठिकाणी शाळांनी जवळचा जिमखाना परिसर, स्टेडियम, मोकळ्या मैदानावर योगा केला. दोन्ही सत्रातील एकत्र विद्यार्थ्यांनी सामूहिक योग शिबिरात गर्दी झाली. पावसामुळे खराब झालेले मैदान पाहता काहींनी सामूहिक योगाचा पर्याय नाकारत वर्गातील बाक बाजूला करून वर्गात तसेच वऱ्हांडय़ात योगाचा सराव केला. यात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला.

आडगांव येथील पोलीस मुख्यालय परेड मैदानावर नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने योग दिन साजरा करण्यात आला. जिल्हा अधीक्षक संजय दराडे, नाशिक परिक्षेत्राचे नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यावेळी उपस्थित होते. शिबिरात अधिकारी, कर्मचारी, पोलीस कुटुंबीय तसेच माध्यमिक विद्यालय वाडीवऱ्हे, जनता इंग्लिश स्कूल सायखेडा आदी परिसरातील विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांना योग शिबीरात पतंजली योग विद्यापीठ नाशिकचे योग प्रशिक्षक संतोष शेवाळे, बंगळूरू योगविद्यापीठाच्या प्रशिक्षक सरिता संत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. दोरजे आणि दराडे यांनी उपस्थितांना योगासनाचे फायदे, त्याचे आरोग्यावरील परिणाम याबाबत माहिती दिली. आरोग्य विभागाच्या वतीने योगदिनाच्या पूर्वसंध्येला योगदिंडी काढत योग दिनाचा जागर करण्यात आला. गुरुवारी सकाळीच रुग्णालयाच्या आवारात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योगाचे विविध प्रात्यक्षिक केले. जिल्हा परिसरात ज्येष्ठ नागरिक मंडळ, सामाजिक संस्थांनीही समाजमंदिर, मंदिराच्या आवारात योग शिबीर घेत योग दिनाचा आनंद लुटला.

उत्साह दुपारी मावळला

सकाळच्या सत्रात जाणवणारा योगाचा उत्साह दुपारच्या सत्रात मावळला. मूल्यशिक्षणाच्या तासाला योगाचे मोजके प्रकाराचे प्रात्यक्षिक दाखवत योग दिनाचा सोपस्कार पूर्ण करत छायाचित्रे काढत अपेक्षित अहवालाच्या नोंदी शिक्षण विभागाकडे जमा केल्या. बहुतांश योग वर्गाकडे शिक्षण विभागाचे अधिकारी फिरकलेही नाही. या धावपळीत सकाळी लोकप्रतिनिधी, प्रशासन अधिकारी योग दिनासाठी जवळच्या शाळा किंवा सामूहिक योग शिबीरात सहभागी झाले. विविध प्रकारच्या योगाचे व्यायाम प्रकार त्यांनी केले.