सार्वजनिक प्रसाधनगृहांची बिकट अवस्था

स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्रीय समितीच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर महापालिकेने शहराच्या मुख्यत्वे दर्शनी भागात स्वच्छतेला प्राधान्य दिल्याने अन्य भागाची स्थिती ‘जैसे थे’ असल्याचे दिसत आहे. मुख्य रस्त्यांवरील दुभाजकाची स्वच्छता आणि रंगरंगोटी करणाऱ्या पालिकेने दुसरीकडे सार्वजनिक  शौचालयांच्या स्वच्छतेकडे मात्र कानाडोळा केला आहे. राजकीय मंडळी, पालिकेचे अधिकारी आणि इतर क्षेत्रातील बडय़ा व्यक्तींच्या भ्रमंतीचे आवडते ठिकाण असलेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सार्वजनिक शौचालयांची बिकट अवस्था ठळकपणे अधोरेखित होत आहे. दर्शनी भागात स्वच्छतेसाठी आटापिटा करणाऱ्या पालिकेने या मैदानासह एकूणच शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यास ‘दिव्याखाली अंधार’ अशी स्थिती राहील, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

मागील तीन-चार आठवडय़ांपासून शहरात स्वच्छतेची कामे गतिमान झाली आहेत. स्वच्छ भारत अभियानात सर्वेक्षणासाठी केंद्रीय समिती येत आहे. या दौऱ्यात स्वच्छ नाशिकचे चित्र समोर जावे, याकरिता सत्ताधारी, पालिका प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने महापौर, उपमहापौर, गटनेता, स्थानिक नगरसेवकांच्या सोबतीने दौरा करून आढावा घेतला. या पाहणीत संबंधितांना ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याचे दर्शन घडले. अवघ्या काही दिवसांत स्वच्छता करणे अवघड असल्याचे लक्षात घेऊन पालिकेने आरोग्य विभाग, बांधकामासह इतर विभागांचे अडीच ते तीन हजार कामगार या कामात जुंपले आहेत.

ज्या भागात समितीचा दौरा होईल, अशा संभाव्य ठिकाणांकडे प्राधान्याने लक्ष देऊन स्वच्छतेचे काम सुरू आहे. कचरा संकलनासाठी बसविलेल्या पेटय़ाही वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

या कचरा पेटय़ांची खरेदी जादा दराने केल्याचा आक्षेप घेत ज्या ठिकाणी त्या बसविल्या, ती ठिकाणे कचरा कुंडी बनल्याकडे शिवसेनेने लक्ष वेधले. अनेक ठिकाणी हे वास्तव असल्याचे उघड झाले. सार्वजनिक स्वच्छतेबरोबर जलतरण तलाव, सार्वजनिक शौचालये यांची स्वच्छता गरजेची आहे. ही कामे प्रगतीपथावर असल्याचा दावा केला जात असला तरी  प्रत्यक्षात वेगळीच स्थिती आहे.

झोपडपट्टी परिसरातील सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता तर दूरची गोष्ट, मध्यवर्ती भागातील प्रसाधनगृहांची स्थिती बिकट असल्याचे दिसून येते. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील प्रसाधनगृह त्याचे प्रातिनिधिक उदाहरण. सकाळ-सायंकाळ हजारो नागरिक या ठिकाणी भ्रमंतीसाठी येतात.

त्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, पालिकेचे अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील बडय़ा मंडळींचा समावेश असतो.मैदानावरील प्रसाधनगृहांची अवस्था दयनीय असल्याची तक्रार गायत्री पारख यांनी केली. मैदानाबाहेर त्र्यंबक रस्त्यावर स्वच्छता मोहिमेचा फलक झळकत आहे. रस्त्यावर रंगरंगोटी केली जात असताना मैदानावरील स्वच्छतागृहाची ही स्थिती आहे. महिलांचे स्वच्छतागृह त्यास अपवाद नाही. त्याची अवस्था इतकी  बिकट आहे की कोणी वापर करण्यास धजावणार नसल्याचे त्यांनी सूचित केले.

काही दिवसांपूर्वी मैदानावरील समस्यांबाबत क्लबच्या सदस्यांनी स्थानिक आमदारांकडे गाऱ्हाणे मांडले होते. सर्व प्रश्न जाणून घेत त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले गेले. स्वच्छतागृहाच्या प्रश्नाकडे महापालिकेकडे पाठपुरावा केला गेला. परंतु, आजतागायत त्याच्या स्वच्छतेकडे कानाडोळा केला गेल्याची खंत येथे भ्रमंतीसाठी येणारे व्यक्त करतात.

महापालिकेच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह

शहरात सार्वजनिक शौचालयांची संख्या मोठी आहे. मध्यवर्ती भागातील शौचालयांची नियमित स्वच्छता होत नसताना झोपडपट्टी आणि आड बाजूकडील प्रसाधनगृहांची काय स्थिती असेल, याचा विचार करता येईल याकडे लक्ष वेधले जात आहे. समिती येणार असल्याने दृश्य स्वरूपात स्वच्छता दिसेल याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. तो नगण्य असूनही प्रशासन तो वाढविण्याचा प्रयत्न करीत नाही. स्वच्छता दूतांच्या मदतीने पालिकांच्या शाळेत व्याख्याने दिली जातात. स्वच्छतेची जबाबदारी विद्यार्थी, नागरिकांवर असल्याचे सांगितले जाते. परंतु, महापालिकेची जी जबाबदारी आहे, तीच योग्य पद्धतीने पार पाडली जात नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.