‘शोध’ या पहिल्याच कादंबरीने अफाट वाचकप्रियता मिळवलेले लेखक मुरलीधर खैरनार यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. साहित्यिक, नाट्यकर्मी आणि इतिहासाचे अभ्यासक म्हणून मुरलीधर खैरनार यांची ओळख होती.
खैरनार यांची एक उत्तम माहितीपट निर्माता, नाट्य अभिनेता, दिग्दर्शक, व्याख्याता व कलासंघटक म्हणून ओळख होती. त्यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, दीपक मंडळ, शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणूनही काम पाहिले होते. मुरलीधर खैरनार यांच्या याच वर्षी जुलै महिन्यात प्रकाशित झालेल्या ‘शोध’ कादंबरीने वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली. वाचकांच्या पसंतीस पडलेल्या या कादंबरीची अवघ्या एका महिन्यात दुसरी आवृत्ती छापावी लागली.
सर्जनशील लेखनासाठी मुरलीधर खैरनार हे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या अभ्यासवृत्तीचे मानकरी ठरले होते.