महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष अभ्यासक्रमांच्या नियोजित लेखी परीक्षा करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा १९ एप्रिलपासून होतील.

या बाबतचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या बाबतची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली. परीक्षेबाबत अद्ययावत माहिती आरोग्य विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. प्रथम आणि द्वितीय वर्ष (उन्हाळी – २०२०) परीक्षांचे समचिकित्सा, आयुर्वेद, भौतिकोपचार विद्याशाखांचे निकाल प्रक्रियेचे कामकाज सुरू आहे. आठ मार्चपासून सुरू करण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेस विद्याथ्र्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे.

लेखी परीक्षेनंतर लगेचच विद्याथ्र्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्याथ्र्यांना एक वर्षासाठी आंतरवासियता कार्यक्रम करावा लागणार आहे. या कालावधीत हे विद्यार्थी करोना रुग्ण सेवेकरीता उपलब्ध होतील. करोनाचा प्रादुर्भाव आणि राज्य शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या निर्देशानुसार परिस्थितीनुरुप धोरणान्वये परीक्षा संचलन करण्यात येईल, असे डॉ.पाठक यांनी म्हटले आहे.