महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेत नाशिक केंद्रातून लोकहितवादी मंडळ या संस्थेच्या ‘याही वळणावर’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले. नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने सांगण्यात आले.
राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ५५व्या राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धा परशुराम साईखेडकर नाटय़ मंदिरात उत्साहात पार पडल्या. स्पर्धेत २१ नाटय़प्रयोग सादर करण्यात आले. त्यात नाशिक केंद्रात आर. एम. ग्रुप नाशिक संस्थेची ‘माय डीयर शुबी’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आणि मेनेली अॅमॅच्युअर्स या संस्थेच्या ‘याही वळणावर’ नाटकास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. दिग्दर्शनासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक हेमंत देशपांडे (याही वळणावर), प्रशांत हिरे (माय डीयर शुबी), प्रकाश योजनेसाठी प्रबोध हिंगणे (याही वळणावर), रवी रहाणे (माय डीयर शुबी), नेपथ्य – किरण समेळ (याही वळणावर), शैलेंद्र गौतम (हयवदन), रंगभूषेसाठी माणिक कानडे (हयवदन), सुजय भालेराव (फूटपाथ), उत्कृष्ट अभिनयाचे महेश डोकफोडे (याही वळणावर), लक्ष्मी पिंगळे (माय डीयर शुबी), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्राने माधवी जाधव (याही वळणावर), प्रिया सातपुते (हयवदन), पल्लवी पटवर्धन (अखेरची रात्र), रसिका पुंड (याही वळणावर), शीतल थोरात (फूटपाथ), नरेंद्र दाते (याही वळणावर), शौनक गायधनी (हू इज डेड), सचिन रहाणे (नट नावाचे नाटक), विशाल रुपवते (बायको पाहावी सांभाळून), भाऊ साळवी (अरण्यभूल) यांना गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून श्रीकांत फाटक, देवेंद्र यादव, शमा सराफ यांनी काम पाहिले.