नाशिक : सुरगाणा तालुक्यातील माणी परिसरात विद्युत मंडळाच्या निष्काळजीपणामुळे गावातील एका युवकाला जीव गमवावा लागला. ही घटना बुधवारी घडली.

माणी गावात कहांडोळे यांचे खाद्यपदार्थाचे दुकान आहे. मंगळवारी सकाळी सुरगाणा ते बाऱ्हे या मुख्य रस्त्याने विजय कहांडोळे हे गावातील दुकानात स्वयंपाकासाठी लागणारे पाणी आणण्यासाठी आपल्या दुचाकीवर लहान भाऊ योगेश यांच्या सोबत निघाले होते. त्यावेळी पावसाची रिपरिप सुरू होती. दोघे दुचाकीवरून सुरगाण्याकडील रस्त्याने निघाले असता गावाच्या कमानीपासून ५०० मीटरवर पावसामुळे विद्युत खांब उन्मळून पडला होता. त्या खांबावरील तारा विजयच्या अंगावर पडल्या. या तारांमध्ये विजय अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पाठीमागे बसलेल्या लहान भावास विजेचा धक्का बसल्याने तो देखील दुचाकीवरून दूर फेकला गेला. जखमी योगेशवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विद्युत कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला. घटनास्थळावर सुरगाणा ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वीज वितरण कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. रस्त्याच्या कडेला असलेला खांब, लोंबकळणाऱ्या विद्युत तारा बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.