चित्रपटाच्या माध्यमातून नाशिकचा नवा चेहरा दाखविण्याचा प्रयत्न

आजची पिढी ही बिघडलेली..नीतीशून्य असा ठपका त्यांच्या माथी मारत पालकवर्ग मोकळा होतो. पालकांनी विश्वास आणि मैत्रीपूर्ण संबंध आपल्या पाल्यासोबत ठेवले तर चित्र काहीसे वेगळे असेल, असा संदेश देणाऱ्या उनाड मुलांवर आधारित ‘यंग्राड’ या चित्रपटात नाशिकच्या काही नवोदित कलाकारांना संधी देण्यात आली आहे. चित्रपटाचे बहुतेक चित्रीकरण नाशिक परिसरात करण्यात आले आहे.

काही वर्षांपासून मराठी चित्रपट, मालिकांमधून नाशिकचे अनेक कलाकार पुढे येत आहेत. ‘रिंगण’ प्रसिध्द दिग्दर्शक मकरंद माने यांचा ‘यंग्राड’ हा नवीन चित्रपटही त्यास अपवाद नाही. हा चित्रपट सहा जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या पाच युवांपैकी चैतन्य देवरे, सौरभ पाडवी, शिव वाघ आणि शिरीन पाटील हे चारही कलाकार नाशिकचे असून अन्य सहकलाकारांचा चमूही नाशिकमधील आहे. विठ्ठल पाटील, गौतम गुप्ता, गौरव गुप्ता आणि मधु मंटेना यांनी एकत्रित येत चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चित्रपटात शरद केळकर, सविता प्रभुणे, मोनिका चौधरी, शशांक शेंडे, विठ्ठल पाटील आणि शंतनू गणगणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात नाशिकचे नाटय़लेखक दत्ता पाटील यांच्यासह क्षितिज पटवर्धन, माघलूब पुनावाला यांची गिते असून  शंकर महादेवन, दिव्य कुमार, शाश तिरुपती आणि हद्य गट्टानी यांनी स्वरसाज दिला आहे.

बी. वाय. के. महाविद्यालयातील चैतन्य देवरे हा कलाकार आणि  आम्ही मुळ नाशिकचे असलो तरी चित्रपटाच्या निमित्ताने नाशिक नव्याने उलगडल्याचे सांगितले. पात्र साकारतांना त्याचे गंगाघाटाशी असणारे नाते जवळून अनुभवता आले.

चित्रपटात काम करण्याचा आनंद होता, पण ज्येष्ठ मंडळी यात असल्याने एक प्रकारचे दडपण होते. मात्र मोठय़ांनी ते दडपण येऊच दिले नाही, असे त्याने नमूद केले. क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरीन पाटीलनेही हाच सूर पकडला.

सविता प्रभुणे  यांच्यासोबत काम करण्याचे दडपण आले होते. एक अनामिक भीती होती, मात्र सगळ्यांनी आमच्या सोबत मैत्रीपूर्ण नाते ठेवल्याने काम करणे फार जड गेले नाही. यासाठी माने यांनी घेतलेली कार्यशाळा उपयुक्त ठरल्याचे शिरीनने सांगितले.

व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या सौरभ पाडवीने मूळ नाशिकचा असलो तरी नाशिकची नवी ओळख झाल्याचा अनुभव मांडला. रोज सकाळी चित्रीकरणाआधी आम्हाला सैरसपाटा करण्यासाठी पाठवले जायचे. आमच्यासाठी हा विरंगुळा असला तरी ती एक शिकवण होती. कोण कसे बोलतो, नाशिकच्या बोलीभाषेचा लहेजा, माझं पात्र मला इथे गंगा घाटावर सापडले, असे त्याने सांगितले. पंचवटी महाविद्यालयाच्या शिव वाघने गंगा घाट नाशिककरांसाठी नवा नाही, पण या ठिकाणी चित्रीकरण करतांना सकाळ पूजेसह कर्मकांडासाठी झालेली गर्दी, दुपारी मोकळ्या वेळेत उनाड मुलांनी पाण्यात मारलेला निवांत सूर आणि संध्याकाळी दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी सुरू असलेली शतपावली अशी विविध रूपे जवळून अनुभवता आल्याचे नमूद केले.

नाशिकचे कलाकार, नाशिकमधील वेगवेगळी स्थळे पाहण्यासाठी तसेच पालक आणि मुले यांच्यातील संघर्षांत फुलणारे नाते अनुभवण्यासाठी कलाप्रेमींनी चित्रपटास गर्दी करावी, असे आवाहन संपूर्ण चमूने केले.

स्वच्छंद जगणे आणि जबाबदारीवर दृष्टिक्षेप

यंग्राड हा बोलीभाषेतील प्रचलित शब्द असून उनाड मुलांसाठी तो वापरला जातो. चित्रपटात असेच चार उनाड मित्र, त्यांचे मैत्रीतील हेवेदावे, प्रेम, विश्वास अशा सर्व भावनांना स्पर्श करतात. त्यांचे घसरणारे पाऊल यावर चित्रपट भाष्य करतो. चुकलेला निर्णय, क्षण, सुधारताना कुटुंबाचा विश्वास आणि पाठिंबा कसा गरजेचा आहे, याकडे लक्ष वेधताना मुलांना स्वच्छंद जगणे आणि जबाबदाऱ्या, भविष्य यातील पुसटशी सीमारेषा ओळखता येणे गरजेचे आहे, हे या चित्रपटातून सांगितले गेले आहे, असे मकरंद माने यांनी नमूद केले.