जमीन परत मिळण्यासाठी इगतपुरीतील तरुणांचे प्रयत्न
तालुक्यात मोजवत नाही इतकी धरणे बांधण्यात आली असली तरी आजही तालुक्यात शेतीसाठी पाणीपुरवठा तर दूरची गोष्ट, पण जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. लष्कर, लोहमार्ग, राष्ट्रीय महामार्ग, उद्योगधंदे अशा सर्व प्रकल्पांसाठी जमीन देऊनही तालुक्यातील तरुण रोजगारापासून वंचित आहे. प्रकल्पग्रस्त असूनही शासकीय नोकरीसाठी संधी नाही. असे का, असा प्रश्न तालुक्यातील युवकांनी केला आहे. राज्यातील इतर जिल्हे हक्काच्या जमिनीसाठी प्रयत्न करत असताना इगतपुरी तालुक्यातील राजकारणी सूस्त बसला आहे. कोणीही हक्काच्या जमिनीसाठी लढा देण्यास पुढे येत नसल्याची खंत युवकांनी व्यक्त केली आहे.
मराठवाडय़ातील काही नेते राजकारण करून जिल्ह्यातील काही नेत्यांना हाताशी धरून पाणी पळवण्याच्या प्रयत्नात आहेत. वैतरणा धरणाचे पाणी मुकणे धरणात कालव्याव्दारे टाकायचे आणि तेच पाणी दुष्काळाच्या नावाखाली मराठवाडय़ास नेऊन उद्योग धंद्यासाठी वापरायचे, असा बेत असल्याचा संशय युवकांनी व्यक्त केला आहे. इगतपुरी तालुका कोरडा करायचा का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तालुक्यातील धरणग्रस्तांना दाखले दिलेले नाहीत. भूसंपादनाच्या मोबदल्यात पैसे नाहीत. वैॅतरणा जलविद्युत प्रकल्प असताना भारनियमन सुरू.
कोणत्याही नोकर भरतीत आजपर्यंत मुंबई महानगरपालिकेने धरणग्रस्तांना नोकरीत घेतलेले नाही. मुकणे धरणाचे पाणी गोंदे वसाहतीसाठी वापरले जाते. नाशिकसाठी पाणी देण्यात येणार असतानाही धरणग्रस्तांचा मुद्दा कायम आहे. लष्कर व रस्त्यांसाठी हजारो हेक्टर जमीन देण्यात आली आहे. असे अनेक मुद्दे युवकांनी मांडले असून न्याय मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.
हक्काच्या जमिनीसाठी उठा, लढा आणि संघर्ष करा. तालुका वाचवा, मदत करा, शेतकरी जगवा, अशी हाक धरणग्रस्त शेतकरी उमेश खातळेने दिली आहे.
इगतपुरी तालुक्यात मोठय़ा प्रमाणात पर्जन्यमान आहे म्हणून या ठिकाणी तबल दहा ते बारा छोटी मोठी धरणे आहेत. मात्र या धरणासाठी ज्यांनी जमीन दिली ते शेतकरी प्रकल्पग्रस्त आजही मोबदल्यापासून वंचित असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

इगतपुरी तालुका हा तसा सुदैवी मानला जातो, त्यामुळे या तालुक्यात औद्योगिक वसाहत मोठय़ा प्रमाणात वसलेली आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावर मोठे उद्योगधंदे उद्योजकांनी येथील पाण्याच्या जिवावर व मुंबई जवळ असल्यामुळे सुरूकेले. मात्र तालुक्यातील तरुण आजही बेरोजगारच आहे.
-संदीप किर्वे

इगतपुरी तालुक्यात
वैतरणा, मुकणे, दारणा, भावली, वाकी खापरी अशी छोटी मोठी ११ धरणे आहेत. या धरणांसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांची
जमीन संपादित करण्यात आली. मात्र त्यांच्याच शेतीला पाणी मिळत नाही. पिण्याच्या पाण्याचीदेखील गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
-निवृत्ती खातले

इगतपुरी हा निसर्गाचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या तालुक्यात मुबलक पाणी, मुबलक जमीन, डोंगरदऱ्या अशी विपुल संपत्ती आहे. मुंबई व नाशिकचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून या तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे. परंतु, येथील तरुण रोजगारापासून चार हात दूर आहे. लष्करासाठी काही हेक्टर जमीन संपादित करणाऱ्या शासनाने येथील प्रकल्पग्रस्तांचा कधी विचारच केला नाही. त्यामुळे सर्व तरुणांनी एकत्र येऊन हक्काच्या जमिनीसाठी लढा दिला पाहिजे.
-पांडुरंग वारुंगसे (उपसभापती)

जाकीर शेख