खेडभैरवची घटना

नाशिक : बिबट्यांचे जणू काही माहेरघर बनलेल्या इगतपुरी तालुक्यात आता बिबट्याचे बालकांसह तरुणांवरही हल्ले होऊ लागले आहेत. खेडभैरव परिसरात असलेल्या ठाकूरवाडी शिवारात आजीसमवेत घरी जाणाऱ्या बालिकेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. या घटनेला आठ दिवस उलटत नाही तोच त्याच परिसरात शनिवारी सायंकाळी घराजवळ असलेल्या ४५ वर्षाच्या युवकावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले.

तालुक्यात बिबट्याकडून होणारे हल्ले आता नेहमीचे झाले आहेत. कधी बालिका, कधी वृद्ध आणि आता तर युवकांवरही बिबट्याचे हल्ले होऊ लागल्याने खेडभैरव, काननवाडी, ठाकूरवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. बिबट्यांचे हल्ले वाढू लागले असून उन्हाळ्यात पाण्यासाठी ते शेत शिवारांमध्ये येण्याची अधिक शक्यता असल्याने बिबट्याचा संचारही वाढेल. त्यामुळे शेतशिवार, वाड्यांवर राहणाऱ्या ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  शनिवारच्या घटनेत आवडू सोमा आवाली (४५) हा ठाकूरवाडीच्या खेडभैरव मंदिराजवळ उभा असताना बिबट्याने हल्ला के ला. अचानक झालेल्या हल्ल्याने युवकाने आरडाओरड केल्याने ग्रामस्थ धावले. ग्रामस्थांनी बिबट्याला पिटाळून लावल्याने युवकाची सुटका झाली. जखमी युवकास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागील आठवड्यात याच ठिकाणी एका बालिकेवर बिबट्याने हल्ला केला होता. या घटनेनंतर वनविभागाने दोन पिंजरे लावले होते. दोन दिवस पिंजरे ठेवूनही बिबट्याने हुलकावणी दिली होती.  खेडभैरव घटनेची दखल घेत वनविभागाने परिसरात  दोन पिंजरे लावले असून बिबट्यांच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅपकॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. एकाच ठिकाणी एकाच आठवड्यात दोन वेळा बिबट्याने हल्ला के ल्याने अद्यापही वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह व्यक्त केले जात आहे. शासनाकडून जखमीना तात्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी सुनील वाजे यांनी केली आहे. बिबट्या जेरबंद करण्यासाठी तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल दत्तू ढोन्नर तसेच वनरक्षक, वनमजूर  लक्ष ठेवून आहेत.

घोडेवाडीतही युवकावर हल्ला

इगतपुरी तालुक्यातील घोडेवाडी येथे बिबट्याने रविवारी के लेल्या हल्लात पंढरी घोडे (३७)  हा तरूण जखमी झाला. पंढरी हा  घरासमोर असलेल्या शेतात गव्हाची पाहणी करत असताना पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला के ला. हल्ल्यात पंढरीच्या पाठीला दुखापत झाली. परिसरातील नागरीकांनी तातडीने धाव घेतल्याने बिबट्या फरार झाला. वनविभागाकडून घोडेवाडीसह जवळील ठाकू रवाडी परिसरात चार पिंजरे लावण्यात आले आहेत.