२० हजार रूपयांच्या खंडणीनंतर सुटका

नाशिक : सटाणा येथील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दोधेश्वर नाक्यावरील खाद्य पदार्थाची गाडी लावणाऱ्या युवकास चौघांनी पोलीस असल्याचे भासवून धाक दाखवत बळजबरीने गाडीत बसवले आणि चार लाख रुपयांच्या खंडणीसाठी भरदुपारी अपहरण के ले. २० हजार रूपये मिळाल्यावर त्यांनी तरूणाला सोडून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सटाणा पोलिसांनी अपहरण, खंडणीचा गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणी सनी आहिरे (रा.मुळाणे, बागलाण) यांनी तक्रार दिली. सटाणा पोलीस ठाण्यापासून जवळ असलेल्या दोधेश्वर नाक्यावर तो हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. नेहमीप्रमाणे त्याने गाडा लावला असताना दुपारी पावणे तीन वाजता पांढऱ्या रंगाच्या तवेरा मोटारीतून आलेल्या विकी गुर्जर याने सनीची कॉलर पकडून बळजबरीने वाहनात बसविले. यावेळी वाहनाचा चालक असलेल्या जयेश जाधव याला सनीने ओळखले. सनीला मालेगाव रस्त्यामार्गे आघार रावळगाव फाटा येथे गाडीतून नेण्यात आले. तेथे त्यांचे आणखी दोन मित्रही वाहनात बसले. संवादावरुन एकाचे नाव पोलार्ड तर दुसऱ्याचे नाव जाधव असल्याचे समजले. त्यापैकी जाधवने ‘मी पोलीस आहे, तुझ्या घरी फोन लाव’ असे धमकावले. त्यानुसार सनीने आईला फोन लावल्यावर घाबरलेल्या आईने, ‘आमच्याकडे इतके पैसे नाहीत, मी पैसे कोठून आणू’ असे सांगताच त्यांनी फोन बंद केला. पोलार्डने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

तेथून संशयितांनी सातमाने, रावळगाव, लखमापूरमार्गे घेऊन येतांना सनीला मारहाण करून दमही दिला. यावेळी त्यांनी ‘तुला दोन लाख रुपये तरी द्यावेच लागतील’ असे सांगून लगेच पैसे देण्यास घरच्यांना सांग असा दम दिला. त्यामुळे घाबरलेल्या आईला फोन करून आपल्या बँक खात्यावर तत्काळ २० हजार रुपये टाकण्यास सनीने सांगितले. यानंतर मालेगाव रस्त्यावरील स्टेट बँकेच्या एटीएममधून २० हजार रुपये काढून जयेश जाधवला दिले. रात्री साडेआठ वाजता त्यांनी सनीला भाक्षी रस्त्यावरील मंजुळे पेट्रोलपंपाच्या मागे सोडले. उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत उर्वरित पैसे आणून दे, नाहीतर तुला बघून घेऊ., असा दम देऊन फरार झाले. घरी कसाबसा पोहचल्यावर सनीने घरच्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. तत्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी विकी गुर्जर आणि जयेश जाधव या दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.