नाशिक : पंचवटीतील रामवाडी परिसरात बुधवारी रात्री २६ वर्षांच्या तरुणाची हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाल्याचे म्हटले जात असून पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये एक विधिसंघर्षित बालक आहे.

बुधवारी रात्री १२ वाजता रामवाडी परिसरातील रामनगरमध्ये राहणारा किशोर नागरे (२६) आपल्या घरासमोर उभा होता. यावेळी दुचाकीवरून तीन संशयित तोंडाला रुमाल बांधून आले. त्यांनी नागरेवर धारदार हत्याराने सपासप वार केले. नागरे यास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या घटनेची माहिती पंचवटी पोलिसांना समजल्यावर पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील संशयित शुभम पांढरे (१९, रा. सोनार लेन) आणि एका विधिसंघर्षित बालकाला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. पांढरे आणि नागरे यांचा मेनरोड परिसरात साधारणत: दोन महिन्यांपूर्वी वाद झाला होता. वादाचे कारण क्षुल्लक असल्याचे कड यांनी सांगितले. या वादातून नागरेची हत्या केल्याची कबुली संशयिताने दिली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.