दीड महिन्यातील सातवी हत्या
नाशिक : पोलिसांकडून गुन्हेगारीला अटकाव करण्यासाठी तडिपारीसह अन्य कार्यवाही करण्यात येत असली तरी नवीन वर्षांत सुरू झालेले शहरातील खून सत्र थांबत नसल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री मागील भांडणाची कुरापत काढत टोळक्याने १९ वर्षांच्या युवकाची हत्या केली. पाथर्डी शिवारात ही घटना घडली. नवीन वर्षांतील हा सातवा खून आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांकडून तडिपारीची कारवाई सुरू करण्यात आली असली तरी या कारवाईचा समाजकंटक किंवा गुन्हेगारांवर फारसा परिणाम होत नसल्याचे चित्र शहर परिसरात आहे. मंगळवारी रात्री पाथर्डी फाटा शिवारात रितेश पाईकराव (१९, रा. सुखदेव नगर) याला मागील भांडणाची कुरापत काढत सात संशयितांनी मारहाण केली. त्याला जखमी अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. इंदिरा नगर पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सुखदेव नगर येथे राहणारे उमेश आव्हाड (१८), नरेश दोंदे (१८), नयन शिंदे (१९) यांच्यासह चार विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. मागील वर्षी मे महिन्यात रितेश आणि या सातही संशयितांमध्ये काही कारणावरून वाद झाले होते. त्यात रितेशने संशयितांना मारहाण केली होती. त्याचा राग मनात ठेवत संशयितांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्याचा खून केल्याची कबुली दिली. संशयित कुठल्याही टोळीशी संबंधित नसून त्यांच्यावर कुठल्याही पोलीस ठाण्यात गुन्हा नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. एस. न्याहळदे यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2019 2:55 am