नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिकसह अनेक भागांत रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हवामान विभागाने नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीसदृश पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर दोन दिवस भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये आलेल्या भाविकांनी शक्य तितक्या लवकर तेथून बाहेर पडावे, यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले. त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या भाविकांची वाहने इगतपुरी व नाशिक येथे रोखून त्यांना माघारी पाठविण्यात येत आहे. याबाबतची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
हवामान विभागाने नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला असून, ३०० मिलिमीटरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे रात्रीच मुंबईहून नाशिकमध्ये दाखल झाले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी अतिवृष्टीचा धोका असलेल्या इगतपुरी व त्र्यंबकेश्वर भागाचा दौरा केला. ज्या भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे, तेथील पाण्याच्या निचऱ्यासाठी करण्यात आलेल्या तयारीची पाहणी करून उपाययोजनांचा आढावा घेतला. अतिवृष्टीच्या संभाव्य धोक्यामुळे काही नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत असून, त्याबाबतची माहितीही त्यांनी जाणून घेतली. इगतपुरीतील मुंबई-नाशिक महामार्गावर पाणी साचू नये आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी नगरपरिषद व जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामांचीही त्यांनी पाहणी केली.
गर्दी होणाऱ्या ठिकाणी विशेष दक्षता
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन यांनी रात्रीपासून मंगळवारी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत अतिवृष्टीची शक्यता असल्याचे सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर दोन दिवस, तर वणी येथील सप्तशृंगी देवी मंदिर एक दिवस बंद ठेवण्यात आले आहे.
आदल्या दिवशी त्र्यंबकेश्वरमध्ये आलेल्या भाविकांनी शक्य तितक्या लवकर बाहेर पडावे, यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी मुंबईहून येणाऱ्या भाविकांची वाहने इगतपुरी येथे, तर इतर भागांतून येणाऱ्यांची वाहने नाशिक येथे थांबवून माघारी पाठविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण यंत्रणा सतर्क असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी रात्री त्र्यंबकेश्वर येथे पाहणी केल्याची माहितीही मंत्री महाजन यांनी दिली.
