चालकाला बेशुध्द करून मद्याची खोकी असलेला कंटेनर घेऊन फरार झालेल्या १० संशयितांना अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील वाहनांसह कंटेनर, मद्याची खोकी २४ तासात ताब्यात घेण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. संशियतांना इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा- नाशिकमधील सिडको प्रशासकीय कार्यालय बंद करण्यावरुन शिंदे गट-भाजपमध्ये मतभेद
या दरोड्या संदर्भात कंटेनर चालक मोहंमद साजिद अबुलजैस शेख (२२, रा. आजमगड, उत्तरप्रदेश) याने घोटी पोलीस ठाण्यात पाच नोव्हेंबर रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथून संशयित कंटेनरमध्ये बसले. सिन्नरच्या पुढे आल्यावर चालकास शिवीगाळ, दमदाटी करुन कंटेनर नाशिकरोडमार्गे सिन्नर असा फिरविण्यास भाग पाडले. सिन्नर- घोटी रस्त्यावरील एका पेट्रोलपंपाजवळ कंटेनर उभा केला. यावेळी एका कारमधून आलेल्या आणखी काही साथीदारांनी चालकाला बेशुध्द करुन मद्याच्या २२०० खोक्यांसह कंटेनर घेऊन पळाले. चालकास नाशिक येथे डांबून ठेवून हरसूलजवळील एका ठिकाणी कंटेनरमधील मद्याची खोकी उतरविण्यात आली होती.
हेही वाचा- नाशिक: मनपाने पेठ रस्त्यावरील वटवृक्ष हटविला; चामारलेणी भागात पुनर्रोपण होणार
या गुन्ह्याचा तपास घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर करत असतांना नांदगाव येथे मद्याच्या बाटल्यांचा मोठा साठा शेतामध्ये ठेवण्यात आला असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे छापा टाकून मालवाहू गाडी, मद्यसाठा आणि दीपक बच्छाव या संशयितास ताब्यात घेण्यात आले. असाच माल त्याने नीलेश जगतापच्या सांगण्यावरुन मनमाड येथे ठेवल्याचे सांगितले. त्यावरुन मनमाड येथील अस्तगाव या ठिकाणावरुन मद्यसाठा जप्त करण्यात आला. याच तपासा दरम्यान दुस-या पथकाने नीलेश जगताप आणि त्याच्या भावास ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्हा करण्यासाठी बरोबर असलेल्या इतर संशयितांची, चालकास डांबुन ठेवलेल्या ठिकाणाची माहिती आणि मुद्देमाल त्र्यंबक, हरसूल येथे वाहतूक करण्यासाठी मदत केलेल्या इतर साथीदारांच्या नावांची माहिती दिली.
मद्यसाठा, चोरी करण्यासाठी वापरलेला टेम्पो, मालवाहू वाहन, कार तसेच पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेला कंन्टेनर असा एकूण ५५,२२,९३६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच गुन्हा करणा-या १० संशयितांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यत एकूण १०५४ मद्याची खोकी ताब्यात घेण्यात आली आहेत.
हेही वचाा- नाशिक: चालकाला मारहाण करुन मद्यसाठा असलेल्या वाहनाची चोरी
अटक केलेल्या संशयितांमध्ये नीलेश जगताप (३५), आकाश उर्फ सोनू जगताप (३२, दोघे राहणार भारत भूषण सोसायटी, पवारवाडी, जेलरोड), चेतन बिरारी (३२, राहणार जे. के. इनक्लु, आर.टी.ओ. ऑफीसजवळ, पंचवटी), दीपक बच्छाव (३१), महेश बच्छाव (२८, दोघे राहणार घर नं. १५५, त्रिमूर्तीनगर, हिरावाडी, पंचवटी), विकास उर्फ विकी उजगरे (२६, रा. बिल्डिंग नंबर बी ४, घरकुल चिंचोळे शिवार, अंबड), धिरज सानप (३०, रा. स्वप्नपूर्ती अपार्टमेन्ट, फ्लॅट नंबर ३०२, मानसे कंपाऊंड, मनमाड), गणेश कासार (३८, रा. मुक्तांगण गार्डन, मनमाड), मनोज उर्फ पप्पु पाटील (३२, रा. गणेश चौक, सिडको) यांचा समावेश आहे. या गुन्ह्याच्या शोध मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे, उपनिरीक्षक सुनील देशमुख आणि पथकाचे देखील सहकार्य लाभल्याची माहिती पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिली. या कामगिरीबद्दल कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.