scorecardresearch

जळगावात २० कोटींपेक्षा अधिक उलाढाल

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त सुवर्णनगरी जळगावात सोने खरेदीस प्रतिसाद दिसून आला.

gold turnover in jalgaon
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

जळगाव : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त सुवर्णनगरी जळगावात सोने खरेदीस प्रतिसाद दिसून आला. सुवर्ण खरेदीतून २० कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

काही दिवसांत सोन्याच्या प्रतितोळा दरात मोठी वाढ झाली आहे. तरीही सुवर्ण खरेदीस ग्राहकांचा उत्साह कायम दिसून आला. लग्नसराईमुळेही खरेदी वाढली असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. बुधवारी सोने दर प्रतितोळा ५८ हजार ७०० रुपये, तर चांदीचा दर प्रतिकिलो ६९ हजार रुपये होता. दोन फेब्रुवारी रोजी सोन्याचा दर प्रतितोळा ५८ हजार ८८० रुपये होता. त्यात महिनाभरापासून चढ-उतार सुरूच होते. गुढीपाडव्याच्या दोन दिवसांपूर्वी सोने प्रतितोळा ६० हजारांपुढे गेले होते. सोमवारी दर ५९ हजार ७५० रुपये होते. तीन दिवसांत सोन्याच्या दरात प्रतितोळा सुमारे एक हजार ५० रुपयांनी घसरण झाली. मुहूर्तावर खरेदी करायची असल्याने अनेक जुने दागिने मोड देऊन मंगळसूत्र, अंगठी व इतर कलाकुसरीचे दागिने करण्यास पसंती देण्यात आली. कलाकुसरीच्या बारीक सोनपोत, कर्णफुले, गव्हाळ मणी, डिझाइनर पँडल; यासोबत पुरुषांच्या सोनसाखळीला मागणी असल्याने आगामी काळात खरेदी वाढू शकते.

चांदीची चमकही कायम राहिली. बुधवारी चांदीचा दर प्रतिकिलो ६९ हजार रुपये होता. मंगळवारी सायंकाळी चांदीचा दर प्रतिकिलो ६९ हजार ५०० रुपये होता. त्यात बुधवारी ५०० रुपयांची घसरण झाली.

सध्या सोन्या-चांदीचे दर दिवसागणिक वाढतच आहेत. अमेरिकेतील बँकांची स्थिती नाजूक झाली असून, दोन बँका डुबल्या आहेत. त्यामुळे सोन्या-चांदीचे दर वाढतेच राहणार आहेत. ते कमी होण्याची शक्यता कमीच आहे. आगामी काळातही दिवसागणिक दर वाढून सोन्याचा प्रतितोळा दर ६२ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. सोने खरेदीदारांची संख्या ५० टक्के आणि गुंतवणूकदारांची संख्या ५० टक्के आहे.

– अजय ललवाणी (अध्यक्ष, जिल्हा सराफ असोसिएशन, जळगाव)

Nashik News (नाशिक / उत्तर महाराष्ट्र न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 04:13 IST

संबंधित बातम्या