नाशिक : पंचवटीतून जाणाऱ्या औरंगाबाद रस्त्यावरील कैलासनगर चौफुलीवर शनिवारी पहाटे खासगी आराम बस आणि डंपर यांची धडक झाल्यानंतर बसला लागलेल्या भीषण आगीत १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर ४१ जण जखमी झाले. यवतमाळहून आलेली ही बस मुंबईकडे निघाली होती. दरम्यान, अपघाताच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मृतांमध्ये बालिका, महिला आणि १० पुरुषांचा समावेश आहे. नातेवाईकांच्या मदतीने सात मृतदेहांची ओळख पटवण्यात आली. जळून खाक झालेल्या उर्वरित मृतदेहांची ओळख पटवणे जिकिरीचे झाले आहे.  

बस डंपरच्या डिझेल टाकीवर धडकल्याने ती फुटली आणि आगीचा भडका उडाला. काही क्षणात बसने पेट घेतला. गाढ झोपेत असलेले प्रवासी आगीत सापडले. काहींनी आपत्कालीन दरवाजा, खिडक्यांच्या काचा फोडून बाहेर उडय़ा घेतल्याने ते वाचले. ‘चिंतामणी ट्रॅव्हल्स’ची ही बस शुक्रवारी दुपारी यवतमाळहून मुंबईला निघाली होती. बसमध्ये ५५ प्रवासी होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास बस नाशिक शहरात येत असताना पंचवटीतील कैलासनगर चौफुलीवर कोळसा वाहून नेणाऱ्या डंपरला तिची धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, बसची दिशा बदलून ती दुसऱ्या रस्त्यावर काही अंतर फरफटत गेली. बसच्या धडकेनंतर डंपरच्या इंधन टाकीचा स्फोट झाला आणि बसने पेट घेतला. काही प्रवाशांनी जिवाच्या आकांताने  खिडक्यांच्या काचा फोडून वा संकटकालीन दरवाजातून उडय़ा घेतल्या. काही प्रवासी मात्र आतच अडकले. त्यांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत १२ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ४१ जखमी झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही वेळात पोलीस आणि अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात आली. परंतु, तोपर्यंत बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता. अग्निशमन दल विलंबाने आले, आवश्यक तितक्या रुग्णवाहिकांची व्यवस्था झाली नसल्याच्या तक्रारी प्रत्यक्षदर्शीनी केल्या. अनेक जखमींना महापालिकेच्या सिटीलिंक बसमधून जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी १० जणांना नंतर खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. अपघातप्रकरणी डंपर आणि बस चालक या दोघांविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर पळालेल्या डंपर चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले. अपघातात बसचा एक चालक जखमी असून दुसरा चालक बेपत्ता आहे. मृतांमध्ये त्याचा समावेश आहे का, याची तपासणी सुरू आहे.

मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी

दुर्घटनेत १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांची ओळख पटविण्यासाठी नातेवाईकांची मदत घेतली जात आहे. अजय कुचनकार (१६, मारेगाव, यवतमाळ), उद्धव भिलंग (४४, परोडी, माळेगाव), लक्ष्मीबाई मुधोळकर (५०) आणि कल्याणी मुधोळकर (तीन, दोन्ही रा. विधी, बुलढाणा) यांची ओळख पटली आहे. काहींची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.

दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना : शिंदे

राज्यातील महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) शोधून अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना केली जाईल. त्यासाठी संबंधित विभागांची लवकरच उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली.

दुर्घटनेची चौकशी : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातस्थळाची पाहणी केल्यानंतर रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि त्यांच्या नातेवाईकांना धीर दिला. तसेच या अपघाताची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मृतांच्या नातलगांना पाच लाखांची मदत

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली. तसेच जखमींचा वैद्यकीय खर्च शासनातर्फे करण्यात येईल आणि शस्त्रक्रिया झालेल्यांना दोन लाखांची मदत दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बसमध्ये दुप्पट प्रवासीभार

अपघातग्रस्त खासगी बसची प्रवासी क्षमता ३० एवढी होती. परंतु, या बसमधून यवतमाळ ते मुंबई प्रवास करणारे ५५ जण होते. क्षमतेहून जवळपास दुप्पट प्रवासी भार घेऊन ही बस मुंबईकडे निघाली होती, असे स्पष्ट झाले आहे.

बसमधील रचना धोकादायक

लांब पल्ल्याच्या खासगी आराम बस ‘डबल डेकर’ असतात. बसमध्ये प्रवाशांना झोपण्यासाठी छोटे ‘बेड’ तयार केलेले असतात. त्यासाठी लाकूड, पडदे आणि गाद्यांचा वापर केला जातो. चिंतामणी ट्रॅव्हलच्या या बसमध्येही अशीच व्यवस्था होती. डंपरची इंधन टाकी फुटल्यानंतर बसला आग लागली. बसमध्ये ज्वलनशील साहित्य असल्याने आग पसरली आणि काही मिनिटांतच बस आगीच्या विळख्यात सापडली, असे सांगितले जाते.