मनमाड – एलटीटी-कामाख्या या संपूर्ण वातानुकूलित विशेष एक्स्प्रेसमधून मनमाड- भुसावळ दरम्यान विनातिकीट प्रवास करताना १३२ उच्चभ्रू रेल्वेच्या विशेष तिकीट तपासणीसांच्या पथकाला आढळले.
विशेष म्हणजे धावत्या गाडीत प्रवाशांना आसनावर गादी, चादरी यांची सेवा देणाऱ्या सात मुलांच्या संगनमताने हा गैरप्रकार सुरू असल्याचे उघड झाले. मात्र त्यात गाडीतील कोच प्रमुख, चल तिकीट तपासणीस यांचाही सहभाग असावा, असा संशय व्यक्त होत आहे. सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना सोमवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. या १३२ विनातिकीट प्रवाशांकडून तीन लाख ८२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
एकिकडे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये दोन महिने आधी आरक्षणासाठी प्रतिक्षेवर राहावे लागत असताना दुसरीकडे अशा साखळीतून उच्च पातळीवरूनच आरक्षणात गैरव्यवहार उघडकीस आल्याने प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. भुसावळ विभागाच्या वाणिज्य व आरपीएफ संघटनांच्या संयुक्त कारवाईत वातानुकुलीत कामाख्या एक्स्प्रेसमधील विनातिकीट प्रवास साखळी अशा रितीने उघड झाली.
रविवारी रेल्वेगाडी लोकमान्य टिळक टर्मिनस–कामाख्या वातानुकूलीत एक्स्प्रेसमध्ये मनमाड ते भुसावळ स्थानक दरम्यान अचानक तिकीट तपासणी मोहीम राबवली गेली. या मोहिमेचे नेतृत्व भुसावळच्या सहायक वाणिज्य व्यवस्थापकांनी (तिकीट तपासणी) केले. त्यांच्या नेतृत्वाखाली १२ फिरते तिकीट तपासनीस (टीटीई) आणि मनमाडहून आलेले पाच आरपीएफ कर्मचारी सहभागी झाले होते.
तपासणीदरम्यान उत्तर पूर्व रेल्वेच्या गादी, चादर सेवा देणाऱ्या शफिकुल, तय्यजूल इस्लाम, फारुकुद्दीन, सईदुल इस्लाम, रफिकुल इस्लाम, सद्दाम हुसैन आणि हबीब अली या सात मुलांना ताब्यात घेण्यात आले, संशयित विनतिकीट प्रवासासाठी प्रवाशांकडून पैसे वसूल करत होते. संबंधितांना अटक करून भुसावळ येथील आरपीएफ अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कारवाईची आकडेवारी
अनियमित प्रवास प्रकरणे – १३२
दंडापोटी वसूल केलेली रक्कम – ३.८२ लाख