जिल्हा रुग्णालायात ‘इनक्युबेटर’ ची कमतरता; आरोग्यमंत्री पाहणी करणार

उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे शासकीय रुग्णालयात झालेल्या बाल मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातही पुरेशा ‘इनक्युबेटर’ अभावी पाच महिन्यात १८७ बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. नवजात बालकांवरील उपचारासाठी अतिदक्षता कक्षाची उभारणी वृक्ष तोडीला परवानगी न मिळाल्याने दहा महिन्यांपासून रखडली आहे. कक्षाच्या उभारणीचे उद्घाटन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. उद्घाटन झाल्यावर या कामाकडे सर्वाचे दुर्लक्ष झाले. अर्भक मृत्यू प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे सोमवारी जिल्हा शासकीय रुग्णालयाची पाहणी करणार आहेत.

या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, मुंबईत रामराजे निंबाळकर यांच्या दालनात बैठक पार पडली. आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस या संदर्भात तक्रार करणारे राष्ट्रवादीचे आ. जयंत जाधव यांच्यासह आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयात नव्याने १८ इनक्युबेटर देण्याची गरज आहे. परंतु, महापालिका सीएसआर निधीतून आपल्या रुग्णालयात ही व्यवस्था उपलब्ध करू शकते. जेणेकरून शासकीय रुग्णालयावरील ताण काहिसा कमी होईल. नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्ष उभारणीच्या रखडलेल्या कामात जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वयकाची भूमिका निभावणे आवश्यक होते. वृक्षतोडीसाठी परवानगीच्या मुद्यावर आता महापालिका व आरोग्य विभाग परस्परांना जबाबदार धरत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच मध्यस्ताची भूमिका निभावली असती तर हे काम रखडले नसते, असे आ. जाधव यांनी सांगितले.

कारण काय?

जिल्हा शासकीय रुग्णालयातील विशेष नवजात दक्षता कक्षात पुरेशा साधन सामग्रीअभावी बिकट स्थिती निर्माण झाली आहे. दाखल होणाऱ्या नवजात बालकांची संख्या अधिक असताना तुलनेत ‘इनक्युबेटर’ मात्र कमी आहेत. परिणामी, चार बालकांना एकाच इनक्युबेटरमध्ये ठेवावे लागत असल्याचे उघड झाले. महापालिकेची शहरात अनेक रुग्णालये आहेत. परंतु, महापालिकेने नवजात बालकांसाठी तशी पुरेशी व्यवस्था नाही. परिणामी, महापालिकेसह खासगी रुग्णालये व ग्रामीण भागातील रुग्णालये रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व अत्यवस्थ बालकांना जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविते. या सर्वाची परिणती जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या दक्षता कक्षावर कमालीचा ताण येण्यात झाली. ऑगस्ट महिन्यात या कक्षात ५५ अर्भकांचा मृत्यू झाला.