चणकापूर धरणातून कळवणसाठी २.२५ दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर

आमदार नितीन पवार, कळवण नगरपंचायतीतील गटनेते कौतिक पगार यांनी यासाठी पाठपुरावा केला.

कळवण : शहराचा वाढत्या विस्तारामुळे लोकसंख्या देखील वाढत असल्याने उपलब्ध साधनातून भविष्यात कळवण शहराला पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून जलसंपदा विभागाने शहरासाठी २.२५ दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर के ले आहे.

शिवाजीनगर, गणेशनगर, संभाजीनगर, रामनगर, गांधी चौक, फुलाबाई चौक, नेहरु चौक, मेनरोड, सावरकर चौक, मोहल्ला,ओतूर रोड आदी नगरपंचायतीच्या १७ प्रभागात कळवण शहर विस्तारले आहे. ग्रामपंचायत असतांना असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातूनच शहरवासियांची तहान नगरपंचायतच्या माध्यमातून भागवली जात आहे. सध्या कळवण नगरपंचायतच्या पाणी पुरवठय़ासाठी जलसंपदा विभागाकडून चणकापूर धरणातून ०.८६ दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर आहे. शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या योजना या गिरणा नदीपात्रात असून योजनांचे उद्भव (विहिरी ) उन्हाळ्यात कोरडे पडतात. त्यावेळी इतर खासगी विहीर मालकाकडून पाणी घेऊन  शहरातील पाणी प्रश्नाची सोडवणूक नगरपंचायत प्रशासनाला काही वेळा करावी लागते.

चणकापूरचे पाण्याचे आवर्तन मालेगावकरांसाठी सोडल्याने गिरणा नदीपात्रातील नकटय़ा (अर्जुन ) बंधारा पाण्याने ओसंडून वहातो. त्यामुळे कळवण नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनांना दिलासा मिळतो. परिणामी पाणी टंचाई जाणवत नाही.

शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून सध्या अस्तित्वात असलेली पाणी पुरवठा योजना अपुरी पडणार होती. त्यामुळे चणकापूर धरणातून कळवण शहराला वाढीव पाणी मंजूर करण्याच्या प्रस्तावाला जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी खास बाब म्हणून मंजुरी दिली.  नगरपंचायतीच्या पाणीपुरवठय़ासाठी जलसंपदा विभागाकडून १.३९ दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर झाले आहेत. सध्या कळवणकरांना पिण्याच्या पाण्यासाठी ०.८६ दशलक्ष घनमीटर पाणी चणकापूर धरणामधून मंजूर आहे . पूर्वीची आणि आजची मंजुरी लक्षात घेता चणकापूरमधून कळवण नगरपंचायतीसाठी आता २.२५ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळे भविष्यात कळवणला पाणी टंचाई निर्माण होणार नसल्याने दिलासा मिळणार आहे. आमदार नितीन पवार, कळवण नगरपंचायतीतील गटनेते कौतिक पगार यांनी यासाठी पाठपुरावा केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 2 25 million cubic meters of water sanctioned from chankapur dam for kalwan zws