पंचवटीतील निमाणी बस स्थानक-जुना आडगाव नाका या अत्यंत वर्दळीच्या व अरूंद रस्त्यावरील सेवाकुंज चौकात बुधवारी बसची धडक बसून तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. तर, पायावरून चाक गेल्याने त्याची आजी गंभीर जखमी झाली. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघाताचे परिसरात तीव्र पडसाद उमटले. संतप्त जमावाने बसची तोडफोड करीत काही वेळ रास्ता रोको केला. परिसरातील शाळांनी या ठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. तथापि, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप जमावाकडून करण्यात आला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
काही दिवसांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्गावर अमृतधाम चौफुलीजवळ झालेल्या विचित्र अपघातात गंभीर जखमी झालेल्या नऊ वर्षांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतांना बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास निमाणी परिसरातील सेवाकुंज येथे तशाच अपघाताची पुनरावृत्ती घडली. आर. पी. विद्यालयातील पूर्व प्राथमिक गटात शिकणारा रोनित अश्विन चौहान (३) हा आजी संगीता चौहान आणि बहीण देविका यांच्या सोबत शाळेतून घरी निघाला होता. विद्यालयाच्या समोरून जाण्यासाठी रस्ता ओलांडत असतांना पंचवटी आगाराकडे जाणाऱ्या बसला पाहून रोनितचा हात आजीच्या हातातून सुटला. आजी त्याच्या मागे जाणार तितक्यात बसची रोनितला धडक बसली आणि तो तिच्या चाकाखाली आला. त्याला वाचविण्याच्या नादात आजीलाही धक्का बसला. आजीच्या हातातील देविका दूरवर फेकली गेली. आजीच्या पायावरूनही बसचे चाक गेले.
ही घटना पाहिल्यावर स्थानिकांनी गर्दी केली. चालक बस सोडून पलायन करीत असतांनाच जमावाने त्याला पकडत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. बसवर दगडफेक करीत तोडफोड केली. आगारातील काही कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव आटोक्यात येत नव्हता. दरम्यानच्या काळात पोलिसांनी धाव घेऊन चालकाला ताब्यात घेत जखमींना खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीमार करण्यात आला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रोनितच्या आई, वडिलांसह इतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या संतापात अधिकच भर पडत होती.
संतप्त जमावाने पोलिसांच्या कार्यशैलीचे वाभाडे काढले. या परिसरात आर. पी. विद्यालय, श्रीराम विद्यालय आहेत. या विद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे भाग पडते. रस्ता सुरक्षितता आणि विद्यार्थी सुरक्षिततेच्यादृष्टीने शहर वाहतूक पोलिसांकडे वारंवार वाहतूक पोलिसाची नेमणूक करा, गतीरोधक बसवावे, सिग्नल बसवावे अशी मागणी केली. त्याचा वारंवार पाठपुरावाही करण्यात आला. तथापि, पोलिसांनी शाळांच्या मागणीला केराची टोपली दाखविली. वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणाची किंमत रोनितला मोजावी लागल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाली. जमावाने त्याचा जाब विचारत रास्ता रोको केला. संतप्त जमावाने वाहतूक पोलीस नेमणुकीसह अन्य काही मागण्यांकडे लक्ष वेधले. पोलिसांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगीत करण्यात आले.
दरम्यान, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संगीता चौहान यांची प्रकृती चिंताजनक आहे.
शाळांच्या मागणीकडे दुर्लक्ष : निमाणी परिसरातील आर. पी. विद्यालय आणि श्रीराम विद्यालयात पाच हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळा सकाळ व दुपार या दोन सत्रात भरतात. दोन्ही सत्रांच्या शाळा भरतांना तसेच सुटतांना होणारी विद्यार्थ्यांची गर्दी, मुख्य रस्त्यावरील अवजड वाहनांची वर्दळ, जवळच असलेले बस स्थानक यांचा विचार करता शाळेकडून या ठिकाणी वाहतूक पोलीस नेमण्यात यावा, गतिरोधक बसवावे अशी मागणी करण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांपासून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे मात्र पोलिसांनी त्याबाबत अनास्था दाखविल्याची संस्थांची भावना आहे.हा रस्ता अरूंद असून रस्त्यावरच उभ्या राहणाऱ्या रिक्षांवर आता तरी कारवाई होणार काय, असा प्रश्न आहे.

वडिलांचा आक्रोश
चिमुकल्या रोनितचे कलेवर पाहून वडील अश्विन यांनी आक्रोश करीत बस चालकाला माझ्या ताब्यात द्या नाही तर बस माझ्या अंगावरून जाऊ द्या, असे सांगत बससमोर लोटांगण घातले. त्यांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले.

लोकप्रतिनिधींचे ‘देखलेपण’
पंचवटीतील सेवाकुंज परिसरात झालेल्या बस अपघातात तीन वर्षांच्या चिमुरडय़ाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी हजेरी लावत माध्यमांसमोर ‘चमकोगिरी’ केली. मात्र, दुपारनंतर परिसरातील आमदारांसह नगरसेवक, अधिकारी संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले.