नाशिक – शहरातील अनधिकृत धार्मिक बांधकामावरील कारवाईदरम्यान उसळलेल्या दंगली प्रकरणी आतापर्यंत ३१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक अल्पवयीन आहे. न्यायालयाने ३० संशयितांना १९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. काठे गल्ली सिग्नल ते नागजी चौक रस्ता लोखंडी जाळ्या आडव्या लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गुरुवारी परिसरातील दुकानेही बंद होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त कायम आहे.

धार्मिक बांधकामावरील कारवाईस विरोध करत जमावाने मंगळवारी मध्यरात्री नागजी चौक, उस्मानीचा चौक परिसरात गोंधळ घातला होता. दगडफेक केली. यात २१ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणेला बळाचा वापर करावा लागला होता. या प्रकरणी जमावाविरोधात पोलिसांवर हल्ला करणे, शस्त्र बाळगणे आदी कलमान्वये मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांची ओळख पटवून सलग दुसऱ्या दिवशीही अटकसत्र सुरू ठेवण्यात आले. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण ३१ संशयितांना अटक करण्यात आली. यातील एक जण अल्पवयीन आहे. संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची १९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली. घटनास्थळावरून पोलिसांनी ९७ वाहने ताब्यात घेतली आहेत. त्याआधारे अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.

परिसरातील दुकानेही बंद

ज्या मार्गावर हे धार्मिक बांधकाम होते, त्या काठेगल्ली ते नागजी चौक, आनंद लॉड्री, पखाल रस्ता चौकापर्यंतचा मार्ग लोखंडी जाळ्यांनी बंद ठेवण्यात आला आहे. कारवाई झालेल्या भागात पायीही जाऊ दिले जात नाही. आसपासच्या रहिवाशांना विचारपूस करून सोडले जाते. या भागातील बहुतांश दुकाने दुसऱ्या दिवशी बंद होती. या भागात स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दल, शीघ्र कृती दल आदींचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी काठेगल्ली सिग्नल ते वडाळा रस्त्यावरील नागजी चौक पर्यंतचा मुख्य मार्ग शुक्रवारी रात्रीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्याची अधिसूचना आधीच काढली आहे.