मनमाड रेल्वे स्थानकात एक रुपयात ३०० मिलिलिटर पाणी | Loksatta

मनमाड रेल्वे स्थानकात एक रुपयात ३०० मिलिलिटर पाणी

मनमाड रेल्वे स्थानकांवर दररोज ११८ प्रवासी गाडय़ांची ये-जा होते.

मनमाड रेल्वे स्थानकात एक रुपयात ३०० मिलिलिटर पाणी
मनमाड रेल्वे स्थानकावर ‘कॉइन वेंडिंग मशीन’चे उद्घाटन करताना खा. हरिश्चंद्र चव्हाण व इतर.

अत्यल्प दरात थंड पाणी देण्याचा उत्तर महाराष्ट्रातील पहिला प्रयोग

प्रवास बसचा असो वा रेल्वेचा. तहान भागविताना १५ ते २० रुपये मोजावेच लागतात. त्यातही फेरीवाल्यांकडून विक्री होणारे बाटलीबंद पाणी शुद्ध असेलच याची शाश्वती नसते. या पाश्र्वभूमीवर, उत्तर महाराष्ट्रात प्रथमच मनमाड रेल्वे स्थानकावर अत्यल्प दरात यंत्राद्वारे थंड पाणी देणारी यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे. एक रुपयात ३०० मिलिलिटर पाणी प्रवाशांना येथे उपलब्ध होणार आहे.

रेल्वे स्थानकावरील कायम गर्दीच्या असलेल्या फलाट क्रमांक २ व ३ वर प्रत्येकी दोन यंत्रणा ‘आयआरसीटीसी’च्या पुढाकारातून बसविण्यात आल्या आहेत. त्यातून प्रवाशांना २४ तास अत्यल्प दरात पाणी मिळणार आहे.

अल्पदरात शुद्ध व थंड पाणी देणारे ‘कॉइन वेंडिंग मशीन’ यंत्रणेचे उद्घाटन खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यंत्रणेतून ग्लासमध्ये घेण्यात आलेले पाणी शुद्ध व थंड असून अतिशय कमी दरात ते उपलब्ध झाल्याने प्रवाशांची मोठी सोय झाल्याची प्रतिक्रिया खा. चव्हाण यांनी व्यक्त केली. मध्य रेल्वेने काही निवडक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गरज ओळखून एटीएम यंत्रणेप्रमाणे पाणी देण्यासाठी वेंडिंग यंत्रणेद्वारे पाण्याची वितरण व्यवस्था केली आहे. पाणी वितरणाची ही व्यवस्था रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर आवश्यक आहे. शिवाय, इतरही खासगी ठिकाणी ती बसवता येणे शक्य असून तशी माहिती आपण संबंधितांकडे मागविल्याचे खा. चव्हाण म्हणाले.

या यंत्रणेसाठी येणारा खर्च, लागणारी जागा, उपलब्ध होणारा पाण्याचा स्रोत, शुद्धीकरण यंत्रणा, पाणी थंड करण्याची प्रक्रिया, पाणी वितरण करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ तसेच रिको ग्लास व बाटल्या यांच्यासाठी येणारा खर्च, नाणी उपलब्ध नसल्यास पर्यायी व्यवस्था, त्याची माहिती चव्हाण यांनी उत्सुकतेने जाणून घेतली. याचा अभ्यास करून इतर रेल्वे स्थानक व बस स्थानकांसह इतरही सार्वजनिक ठिकाणी नगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढाकाराने सर्व ठिकाणी ही सुविधा कशी उपलब्ध करून दिली जाईल, याबाबत पाहणी करण्याबाबत सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.  यंत्रणेद्वारे वितरित होणारे पाणी सात स्तरांवर शुद्ध केले जाते. यंत्रणेसमोर रांग लागल्यास त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सुटे पैसे, एक व पाच रुपयांची कोणती नाणी चालतील व कोणती नाही हेदेखील दर्शविण्यात आले आहे. रेल्वे आल्यावर गर्दीच्या वेळी गोंधळ उडणार नाही याची दक्षता घेण्यात आली असून, शुद्ध पाणी अविरत वितरित होईल यावर देखरेख ठेवली जाणार असल्याचे स्थानक अधीक्षक पी. के. सक्सेना यांनी सांगितले.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागीय डीआरयूसीच्या बैठकीत मनमाडचे सदस्य कांतिलाल लुणावत यांनी हा प्रकल्प राबविण्याची मागणी महाव्यवस्थापक व विभागीय व्यवस्थापकांकडे केली होती. सहा महिने पाठपुरावा केल्यानंतर अखेर ही योजना प्रत्यक्षात अमलात आल्याची माहिती लुणावत यांनी दिली. या वेळी चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मनमाड स्थानक स्थिती

मनमाड रेल्वे स्थानकांवर दररोज ११८ प्रवासी गाडय़ांची ये-जा होते. त्यातून १२ ते १३ हजार प्रवासी रोज या स्थानकावर चढ-उतार करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी पिण्याचे शुद्ध व थंड पाणी अल्पदरात उपलब्ध करण्यासाठी फलाट क्रमांक दोन व तीनवर प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येकी दोन युनिट बसविण्यात आले आहे.

या दरात पाणी मिळणार

ही यंत्रणा एटीएम यंत्राच्या धर्तीवर काम करते. प्रवाशांकडे स्वत:ची बाटली किंवा ग्लास असल्यास ३०० मिलिलिटर पाण्यासाठी एक रुपया, ५०० मिलिलिटरसाठी तीन रुपये आकारण्यात येणार आहे. बाटली नसल्यास एक लिटरसाठी पाच रुपये, दोन लिटरसाठी आठ रुपये, पाच लिटरसाठी २० रुपये असा दर राहील. वेंडिंग यंत्रणेतून ग्लास किंवा बाटलीसह पाणी घेतल्यास ३०० मिलिलिटरसाठी दोन रुपये, ५०० मिलिलिटरसाठी पाच रुपये, एक लिटरसाठी आठ रुपये, दोन लिटरसाठी १२ रुपये, तर पाच लिटरसाठी २५ रुपये आकारले जाणार आहे. रेल्वेतून प्रवास करणारा प्रवासी एकटा असेल व पंधरा रुपयांची एक लिटर पाण्याच्या बाटलीची त्याला गरज नसेल तर एक रुपयात मिळणाऱ्या एक ग्लास पाण्याद्वारे त्याची तहान यंत्रणा भागविणार आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-05-2017 at 01:32 IST
Next Story
पंचवटीत एकाची हत्या