नाशिक: ओबीसी प्रवर्गासाठी जागा आरक्षित करताना अपूर्णाकाऐवजी पूर्णाकातील संख्या घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचनेमुळे महानगरपालिकेत या प्रवर्गासाठी ३६ ऐवजी ३५ जागा आरक्षित केल्या जाणार आहेत. आरक्षण सोडतीबाबत मंगळवारी अधिसूचना प्रसिद्ध होत असून २९ जुलैला चिठ्ठी पद्धतीने सोडत काढण्यात येईल. ४४ प्रभागातील पाच प्रभागात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण आहे. ते वगळून उर्वरित ३९ प्रभागात ही प्रक्रिया राबविली जाईल. यामध्ये १९ प्रभागातील सर्व जागा सर्वसाधारण खुल्या गटासाठी असून तिथे निश्चितपणे ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण पडणार आहे. या आरक्षण सोडतीने इच्छुकांचा जीव पुन्हा टांगणीला लागला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यामुळे महापालिका निवडणुकीतील समीकरणे पुन्हा बदलणार आहेत. यापूर्वी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण वगळून ४४ प्रभागांतील १३३ जागांसाठी सोडत पद्धतीने आरक्षण प्रक्रिया राबविली गेली होती. त्यानुसार अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १९ जागा (त्यातील १० महिलांसाठी आरक्षित), अनुसूचित जमाती संवर्गासाठी १० जागा (पाच महिलांसाठी आरक्षित) आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी १०४ (५२ महिलांसाठी) जागांचा समावेश आहे. महापालिका निवडणुकीसाठी सर्वसाधारण गटाच्या १०४ जागा आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार या जागांपैकी २७ टक्के जागा ओबीसींसाठी राखीव होतील. त्याचा विचार केल्यास महापालिकेत २७ टक्के आरक्षणाच्या निकषानुसार ओबीसी प्रवर्गासाठी ३५.९१ जागा मिळणार होत्या. त्याआधारे ओबीसी प्रवर्गासाठी ३६ जागा आरक्षित करण्याचे नियोजन होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशामुळे ओबीसी प्रवर्गातील एक जागा कमी होणार आहे. या प्रक्रियेत अपूर्णाकांऐवजी पूर्णाकाची संख्या ग्राह्य धरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार ३५ जागा उपलब्ध राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ओबीसी संवर्गाच्या एकूण जागांपैकी निम्म्या म्हणजे १८ जागा महिलांसाठी असतील. ४४ प्रभागांमध्ये प्रभाग आठ वगळता उर्वरित उर्वरित प्रभाग त्रिसदस्यीय आहेत. यातील प्रभाग ११, २७, ३४, २७ व ४४ मध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी जागा आधीच आरक्षित झालेल्या आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षण सोडत प्रक्रियेतून हे प्रभाग वगळले जातील. उर्वरित ३९ प्रभागांमध्ये ती प्रक्रिया राबविली जाईल. विशिष्ट प्रभाग निवडून प्रचाराला लागलेल्या काही इच्छुकांमध्ये धास्ती आहे. महिला आरक्षणाने आधीच अनेक माजी नगरसेवकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले होते. कित्येकांना त्याचा फटका बसला होता. आता संबंधित जागेवर ओबीसी आरक्षण आल्यास काहींना पुन्हा नवा प्रभाग शोधण्याची वेळ येण्याची चिंता सतावत आहे. 

आरक्षणाची शक्यता कोणत्या प्रभागात?

महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्गासाठी ३५ जागा उपलब्ध होतील. त्यासाठी २९ जुलै रोजी चिठ्ठी पद्धतीने सोडत काढली जाणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संवर्गाचे पाच प्रभागात आरक्षण आहे. हे प्रभाग ओबीसी आरक्षण प्रक्रियेतून वगळले जातील. ३९ प्रभागात ही प्रक्रिया राबविली जाईल. त्यातही सर्वसाधारण खुल्या गटाच्या जागा असणारे प्रभाग क्रमांक आठ, नऊ, १०, १३, १६, १७, १८, १९, २१, २९, ३०, ३१, ३२, ३३, ३६, ३७, ३८, ३९, ४० असे एकूण १९ प्रभाग आहेत. या प्रभागांमध्ये ओबीसी आरक्षण निश्चितपणे पडणार असल्याचे मनपातील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या प्रभागातील समीकरणे बदलणार आहेत.