नाशिक – क्रिप्टो करन्सीच्या योजनेत एक लाख ४० हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास दरमहा पाच हजार रुपये लाभांश तसेच या योजनेत नवीन लोकांना जोडल्यास दलाली आणि कॅम्पमॅक्स येथे सहल या आमिषाला भुलून ३८ गुंतवणूकदारांची तब्बल ८१ लाख रुपयांना फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. बहुविध साखळी विपणन (मल्टीलेव्हल मार्केटिंग) योजनेत यापूर्वी हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची उदाहरणे आहेत. असे असताना नवनवीन आमिषांना लोक भुलून या सापळ्यात अडकत असल्याचे पु्न्हा पुन्हा दिसत आहे. यासंदर्भात श्वेता सुरते (रा.पवननगर, सिडको) यांनी तक्रार दिली. त्यावरून प्रसाद तडाखे, पवन उबाळे आणि समर्थ जगताप (रा.नाशिक), खुशाल पवार तसेच ओरीस काॅईन क्रिप्टो करन्सीचे देशातील संचालक, राहुल खुराणा, अविनाश सिंग, रहव ठाकूर या सात जणांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओरीस क्रिप्टो करन्सीच्या भारतातील संचालकांनी ओरीस कॉईन क्रिप्टो करन्सीतील गुंतवणुकीची ही योजना सादर केली होती. त्यानुसार एक लाख ४० हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर विविध आमिषे दाखविली गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यात दर महिन्याला पाच हजार रुपये लाभांश, आणखी लोकांना जोडल्यास दलाली आणि कॅम्पमॅक्स येथे सहलीसह अन्य लाभ मिळणार असल्याचे सांगितले गेले. इतकेच नव्हे तर, करन्सी ओरीस कॉईनचे दर जसे वाढतील, तसे तुमचे पैसे वाढतील, असे सांगून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला गेला. संशयितांनी श्वेता सुरते आणि त्यांचा भाऊ अजिंक्य सुरते यांना अनुक्रमे एक लाख ४० हजार आणि एक लाख १४ हजार रुपये आणि त्यांच्या ३६ परिचित गुंतवणूकदारांना ७८ लाख ८८ हजार याप्रमाणे एकूण ८१ लाख १६ हजार रुपये गुंतविण्यास भाग पाडले. काही काळ, काही गुंतवणूकदारांना परतावा मिळाल्याचे सांगितले जाते. नंतर तो बंद झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधितांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी व्यक्त केली.
भ्रामक योजनांची मालिका कायम
साधारणत: दशकभरापासून भ्रामक योजनांद्वारे गुंतवणूकदारांना गंडा घालण्याचे प्रकार अव्याहतपणे होत आहेत. अडीच वर्षांत तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवत ‘केबीसी’ कंपनीने नाशिकसह राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची तब्बल २०० कोटींहून अधिक रकमेला फसवणूक केली होती. इमू पालन, मैत्रेय, शेअर बाजारातील गुंतवणूक अशा अनेक योजनांमध्ये आधीच गुंतवणूकदारांचे हात पोळले गेले आहेत.