नाशिक – जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये १३ दिवसांनंतर मंगळवारी कांदा लिलाव पूर्ववत झाले. कांद्याच्या सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत सकाळी १० वाजेपर्यंत ४०० वाहने दाखल झाली. या माध्यमातून सहा हजार क्विंटलची आवक झाली. प्रारंभीच्या लिलावात सरासरी दोन हजार रुपये भाव मिळाला. जिल्ह्यातील पिंपळगावसह अन्य सर्व बाजार समित्यांमध्ये लिलावाला सुरुवात झाली आहे.

व्यापारी वर्गात पडलेली फूट, सरकारकडून प्रभावीपणे सुरू झालेली कांदा खरेदी आणि काही बाजार समित्यांमध्ये प्रशासनाने पर्यायी खरेदीची तयारी केल्यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर कांदा व्यापारी संघटनेने लिलावात सहभागी होण्याचे जाहीर केले. त्यानुसार मंगळवारपासून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव नेहमीप्रमाणे सुरू झाले.

हेही वाचा – लेझर किरणांमुळे डोळ्यांना तर, आवाजाच्या भिंतींनी कानांना इजा, नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीतील दणदणाटाचा अपाय

हेही वाचा – नाशिक: शैक्षणिक कामांविरोधात प्राथमिक शिक्षकांचे आंदोलन

व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे १३ दिवस शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. या काळात पाऊस व उन्हाच्या झळांनी चाळीतील कांदा खराब होऊ लागला. जवळपास दोन आठवडे शेतकऱ्यांना कांदा विक्री करता आली नव्हती. बाजार खुले झाल्यानंतर कांदा बाजारात नेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. लासलगाव बाजार समितीत सकाळपासून वाहने दाखल होऊ लागली. १० वाजेपर्यंत ४०० टेम्पो, ट्रॅक्टरपर्यंत ही आकडेवारी गेली. दोन तासांत सहा हजार क्विंटलची आवक झाली. १० वाजता लिलावाला सुरुवात झाली. प्रारंभीच्या लिलावात कांद्याला किमान ९०० ते कमाल २५४१ आणि सरासरी दोन हजार रुपये भाव मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

Story img Loader