नाशिक : करोनामुळे निधन झालेल्या महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या वारसांना पंतप्रधान गरीब कल्याण विमा योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये देण्यात येणार आहेत. दोन सफाई कामगारांना ही विमा संरक्षित रक्कम प्राप्त झाली असून दिवाळी नंतर उर्वरित दोन सफाई कर्मचाऱ्यांना रक्कम देण्यात येणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाअंतर्गत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असणारे गौतम पगारे, संतोष मारू यांचे करोना आजाराने उपचारा दरम्यान निधन झाले. शासनाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्याचे निधन झाल्यावर त्यांच्या पत्नीस पंतप्रधान गरीब कल्याण विमा योजनेअंतर्गत ५० लाखाचा विमा संरक्षण निधी थेट बँक खात्यावर जमा केला जातो.

मयत सफाई कर्मचारी यांच्या वारस पत्नींनी शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर पाालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना कुटे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. सफाई कामगारांच्या वारस पत्नींना पंतप्रधान गरीब कल्याण विमा योजनेंतर्गत निधीचा लाभ उपलब्ध करून दिला. घनकचरा व्यवस्थापन विभागातील उर्वरित दोन सफाई कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण विमा योजनेंतर्गत ५० लाखाचा विमा संरक्षण निधी दिवाळी नंतर मिळणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.