६० ते ७० टक्के मतदान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या चार जिल्ह्य़ांमधील २२ नगरपालिकांसाठी रविवारी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने सरासरी ६० ते ७० टक्के मतदानाची नोंद झाली. अमळनेर, सिन्नर वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. मंगळवारी मतमोजणी होणार असून त्यानंतरच कोणत्या पक्षाने कुठपर्यंत बाजी मारली हे कळणार आहे.

[jwplayer jPX7MVNf]

नाशिक जिल्ह्य़ात भगूर, नांदगाव, मनमाड, सिन्नर, येवला, सटाणा या सहा पालिकांसाठी शांततेत मतदान झाले. सकाळपासूनच मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसून आले. भगूरमध्ये  ८४.८०, सटाणा ७५.४५, नांदगाव ६९.३३, येवला ७६.३३, सिन्नर ७२ टक्के मतदानाची नोंद झाली. सिन्नर येथे प्रभाग क्रमांक आठमध्ये परप्रांतीय कामगार मतदानासाठी आल्यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला. या मतदारांकडे ओळखपत्रासह सर्व कागदपत्रे असताना आक्षेप का घेण्यात येत आहे, असे म्हणत शिवसेनेनेही वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी दोन्ही गटांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. दुपारी साडेबाराच्या सुमारास भाजपच्या बाजूने कौल देणारा एका सव्‍‌र्हेचा अंदाज समाज माध्यमातून फिरण्यास सुरुवात झाल्याने सर्वच जण चकीत झाले. शिवसेनेच्या वतीने यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविण्यात आली. नांदगाव, मनमाड या दोन ठिकाणी आमदार पंकज भुजबळ, सिन्नरमध्ये शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे, भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाची परीक्षा आहे.  जळगाव जिल्ह्य़ात पहिल्या दोन तासात सरासरी २० टक्के  मतदान झाले. दुपारनंतर केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. जिल्ह्यात ३१८ नगरसेवक तसेच १३ नगराध्यक्षांची थेट जनतेतून मतदानाने निवड होणार आहे. नगरसेवक पदासाठी १५५३ उमेदवार, तर नगराध्यक्षपदासाठी ६९ उमेदवार रिंगणात आहेत.

धुळे जिल्ह्य़ात शिरपूर पालिकेसाठी ७०.१५ तर, दोंडाईचात ६९.८८ टक्के मतदान झाले. दोंडाईचात रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख, तर शिरपूरमध्ये माजी मंत्री आ. अमरीश पटेल यांच्या नेतृत्वाची कसोटी आहे. शिरपूरची मतमोजणी सोमवारी करवंद नाक्याजवळील मुकेशभाई पटेल टाऊन हॉलमध्ये, तर दोंडाईचात दादासाहेब रावल क्रीडा संकुलात होणार आहे. शिरपूरमध्ये एकाच वेळी १५ प्रभागांची मतमोजणी सुरू होईल, तर दोंडाईचात १६ टेबलवर मतमोजणी होणार असून तीन प्रभागासाठी एक फेरी अशा चार फेरीत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर निकाल घोषित केला जाईल. प्रत्येक तीन फेरीनंतर नगराध्यक्ष पदाचे मतदान घोषित केले जाईल. सर्वात शेवटी नगराध्यक्षपदाचा निकाल घोषित होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी शिरपूर येथे प्रमुख लढत तिघांमध्येच आहे. काँग्रेसतर्फे माजी मंत्री आ. अमरीश पटेल यांच्या पत्नी जयश्रीबेन पटेल, भाजपतर्फे अमृता महाजन आणि शिवसेनेच्या वतीने मीनाबाई पाटील या उमेदवार आहेत. दोंडाईचात मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवर रावल या भाजपच्या, तर माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचे बंधू डॉ. रवींद्र देशमुख हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. सेनेतर्फे संजय उपाध्ये हेही रिंगणात आहेत. शिरपूरमध्ये नगरसेवक पदाच्या ३० जागांसाठी ८८ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक सहा व १० मधील मुस्लीम महिलांना ओळखण्यासाठी १३ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दोंडाईचात ५७ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. दोन्ही ठिकाणी मतदान शांततेत झाले. नंदुरबार जिल्ह्य़ातील शहादा पालिकेसाठी ७४.२४ टक्के मतदान झाले.

जळगाव जिल्ह्य़ातील अमळनेर येथे आर. के. नगरमध्ये मतदान सुरू असताना एका गटाकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास काही जणांनी आणून दिली. त्यामुळे संतप्त झालेले आमदार शिरीष चौधरी यांनी जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांच्यासह त्यांच्या १० ते १२ समर्थकांना जबर मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या अनिल पाटील यांच्यावर धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जमावाने आमदार चौधरी यांच्या वाहनाची तोडफोड केली. अमळनेरमध्ये आ. शिरीष चौधरी यांची चौधरी मित्र आघाडी, तर जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांची शहर विकास आघाडी यांच्यात चुरस आहे. मतदानाच्या दिवशी एकमेकांविरुद्धच्या सुप्त संतापाचा उद्रेक झाला. दुपारी साडेतीनच्या सुमारास आर.के. नगरात दोघेही समोरासमोर आल्यावर वाद सुरू झाला. आमदार चौधरी यांनी पाटील यांना धक्काबुक्की केल्याचे पाहताच चौधरी समर्थकही पाटील यांच्यावर तुटून पडले. या घटनेत पाटील हे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी हल्लेखोरांना पांगविण्यासाठी लाठीमार केला. जमावाने केलेल्या दगडफेकीत १५ ते २० गाडय़ांचे नुकसान झाले. या घटनेचा काहीसा परिणाम मतदारांवर झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर हे अमळनेरमध्ये तळ ठोकून आहेत.

मतदान प्रक्रिया सुरळीत चालली असताना एका ठिकाणी पैशांचे वाटप चालू असल्याची कुणकुण लागल्याने आपण प्रांताधिकाऱ्यांना ही माहिती दिली. त्यानंतर चौधरी यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी आपणास मारहाण करण्यास सुरुवात केली. लोकशाहीचा गळा घोटण्याचा हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया अनिल पाटील यांनी व्यक्त केली.

[jwplayer 4Ldgg0db]

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 60 to 70 percent voting in north maharashtra
First published on: 28-11-2016 at 01:15 IST