लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: जिल्ह्यातील कृषी फिडर सौर ऊर्जित करून शेतकऱ्यांना दिवसा म्हणूनवीज देण्यासाठी राज्य शासनाच्या दुसऱ्या टप्प्यातील मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात ५० पेक्षा अधिक सौर वीज ऊर्जीकरण उपकेंद्र होणार आहेत. यातून ७०० मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून, त्यासाठी तीन हजार ५६३ एकर गायरान जमिनी जिल्हा प्रशासनाला भाडेतत्त्वावर मिळाल्या आहेत.




मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना राबविण्यात येत आहे. आवश्यक असणारी जमीन तातडीने उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. योजनेद्वारे कृषी अतिभारीत उपकेंद्राच्या पाच किलोमीटरच्या परिघात सौर प्रकल्प कार्यान्वित करून सौरऊर्जा प्रकल्प महावितरणच्या जवळच्या ३३/११ केव्ही उपकेंद्राशी थेट जोडला जाईल. त्यामुळे या कृषिवाहिन्यांवरील ग्राहकांना दिवसा वीज देण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे.
हेही वाचा… धुळे जिल्ह्यात सहा हातभट्ट्या उद्ध्वस्त, अडीच लाखांचा मुद्देमाल नष्ट
सुमारे तीन हजार ५६३ एकर गायरान जमीन, ज्यावर ७०० मेगावॅट सौरऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असलेले सौर पॅनेल, जळगाव जिल्हा प्रशासनाने एमएसईबी सोलर अॅग्रो पॉवर लिमिटेडला भाडेतत्त्वावर दिले आहेत. सौरऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या सिंचन यंत्रणेला दिवसा वीज मिळेल. ग्रामपंचायतींना उत्पन्न मिळेल आणि जळगाव जिल्हा राष्ट्रीय पॉवर ग्रीडमध्ये शाश्वत, पर्यावरणपूरक, नवीकरणीय ऊर्जा जोडेल; जे भारताच्या, महाराष्ट्राच्या आणि जळगावच्या विकासात योगदान देईल, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.