नाशिक : सटाणा न्यायालय आवारात आयोजित लोक न्यायालयात ७२ प्रलंबित तर, दाखलपूर्व ४७६२ प्रकरणे निकाली काढण्यात आले. बागलाण तालुका विधी सेवा समिती आणि सटाणा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये सटाणा न्यायालय आवारात प्रलंंबित व दाखलपूर्व खटले निकाली काढण्यासाठी लोकन्यायालय आयोजित करण्यात आले होते.
यात ७२ प्रलंबित खटले निकाली काढण्यात येऊन दोन कोटी चार लाख ६६ हजार २०६ रुपयांची वसुली आणि दाखलपूर्व ४७६२ प्रकरणे निकाली काढण्यात येऊन एक कोटी २० लाख ६४ हजार २४३ रुपयांची वसुली करण्यात आली. अशा प्रकारे एकूण तीन कोटी २५ लाख ३० हजार ४४९ रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रारंभी लोकन्यायालयाचे उद्घाटन दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष अमित कोष्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी समाजातील गोरगरिबांना जलद गतीने न्याय देण्यासह पक्षकारांच्या वेळेची व पैशांची बचत करण्यासाठी लोकन्यायालय उपयुक्त असून, यात सामोपचार, तडजोडीतून न्यायलयीन प्रकरणात दोन्ही बाजूंना न्याय मिळतो, असे सांगितले.
हेही वाचा >>> धुळ्यात धनगर समाज महासंघाची निदर्शने
दोन्ही पक्षांचे समाधान होते. लोकसंख्येच्या तुलनेत न्यायाधीशांची संख्या कमी असल्याने न्यायदानाला विलंब होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकन्यायालय ही संकल्पना प्रभावी असल्यामुळे लोकन्यायालयाकडे नागरिकांचा कल वाढत आहे. लोकन्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणात तडजोडीने खटल्यांचा निकाल लागला असल्याने ही संकल्पना अतिशय उपयुक्त असल्याचेही कोष्टी यांनी नमूद केले. सटाणा वकील संघाचे अध्यक्ष पंडितराव भदाणे यांनी पाश्चिमात्य देशात जलद गतीने न्याय मिळत असताना आपल्याकडे न्यायाधीशांची संख्या अतिशय कमी असल्याचे सांगितले.