नाशिक : करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असताना मृत्यूचा आकडा मात्र वाढत आहे.

या लाटेत अनेकांना प्राण गमवावे लागले. करोनासोबतच इतर व्याधी, कारणांनी अनेकांचा मृत्यू झाल्याची बाब महानगरपालिकेच्या आकडेवारीतून समोर आली आहे. शहरात मागील चार महिन्यांत नऊ हजार ११२ मृत्यू झाले. यामध्ये शहरासह ग्रामीण, जिल्ह्य़ाबाहेरील रुग्णांचा समावेश आहे.

सलग दोन महिने झपाटय़ाने उंचावलेला करोनाचा आलेख जूनच्या प्रारंभी हळूहळू कमी होत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग इतका वेगाने पसरला की, अस्तित्वातील व्यवस्था कमी पडल्या. प्राणवायू, खाटा, औषधे मिळवताना रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाक झाली. कित्येकांना खाटा मिळाल्या नाहीत. घरी उपचार घ्यावे लागले. उपचाराअभावी काही जण दगावले. सद्य:स्थितीत शहरात दोन हजारच्या आसपास सक्रिय रुग्ण आहेत. शहरात दैनंदिन नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ११५ च्या आसपास आली तर ४५ जणांचा मृत्यू झाला.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार करोनामुळे आतापर्यंत शहरात दोन हजार २०९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील ही आकडेवारी आहे. मागील चार महिन्यांत शहरात एकूण नऊ हजार ११२ मृत्यूंची नोंद आहे. त्यात शहराबरोबर जिल्ह्य़ातील, जिल्ह्य़ाबाहेरील रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये ३५५४ महिला व ५५५८ पुरुष व्यक्तींचा समावेश आहे. करोनाबाधित रुग्णांसह अन्य कारणांनी मयत झालेल्या व्यक्तींचा यात समावेश असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीत जानेवारी ते एप्रिल २०२१ या चार महिन्यांच्या कालावधीत नाशिक पूर्व, पश्चिम, पंचवटी, नाशिकरोड, नवीन नाशिक, सातपूर या सहा विभागीय कार्यालयात या मृत्यूंची नोंद असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.