शफी पठाण

आडगाव म्हणजे, आडवळणावरचे गाव. मराठी साहित्याचा प्रवास अशा अनेक आडगावांच्या गल्लीबोळातून झाला असला आणि त्यातल्या दाहक प्रतिबिंबांनी जगभरातल्या वाचकांना स्तब्ध केले असले तरी संमेलनांनी मात्र अशा आडगावांपासून ‘अंतर’ अगदी कटाक्षाने पाळले. नाशकात मात्र नाईलाज झाला.   

‘अग्निसंप्रदायी काव्य’ या नावाने विशाखेची एक परंपराच मराठी काव्यात निर्माण करणाऱ्या तात्यासाहेबांच्या अर्थात कुसुमाग्रजांच्या गावात हे संमेलन होतेय, असे मोठय़ा अभिमानाने जाहीर करणाऱ्यांच्या डोळय़ादेखत संमेलन गावाच्या बाहेर गेले. किती बाहेर? तर, तब्बल १२ किलोमीटर. जसे हे अंतर बदलले तसे संमेलनाचे स्वरूपही! आता ते साहित्य संमेलनाऐवजी चक्क शालेय स्नेहसंमेलन वाटतेय. शालेय यासाठी कारण, चौफेर नुसते विद्यार्थी दिसताहेत. शिक्षक बोट दाखवतील तिकडे पळत सुटणारे. मुख्य मंडपातील खुर्च्याना चिखलाने वेढा घातलाय आणि उपमंडपांनी अजून बाळसे धरलेले नाही. हे झाले आडगावचे चित्र.

तिकडे नाशिक वेगळय़ाच गुंत्यात गुंतले आहे. गारठवणाऱ्या वाऱ्यात कटिंग चहाच्या सोबतीने तिकडे जी चर्चा चाललीये ती संमेलनाची नव्हे तर ‘ओमायक्रॉन’ची आहे. नाशिककरांपर्यंत जे थोडेफार संमेलन पाहोचतेय ते बातम्यांमधूनच. नाही म्हणायला, ‘भुजां’मधले ‘बळ’ दाखवत संमेलनाचे ‘कौतिक’ सांगणारा एखाद-दुसरा फलक दिसतो गावात. पण, ते औपचारिक दखलपात्रतेच्या पलीकडे नाहीच. ज्या नवीन पिढीपर्यंत वगैरे हे संमेलन पोहोचवायचे दावे केले जाताहेत ती पिढी फेसबुक, इन्स्टावरच्या बारमाही संमेलनात व्यग्र आहे. ज्याला आपण ‘टेक्स्ट’ म्हणतो त्या शब्दांचा मेळा आपल्या गावात भरतोय हे त्यांच्या गावीही नाही. ग्रंथिदडीच्या नावावर तर एक भलताच प्रयोग उद्या होणार आहे. ग्रंथिदडीच्या पालखीचे भोई १२ किलोमीटर कसे चालतील या भीतीने दिंडी नाशिकमध्ये सुरू होऊन नाशिकमध्येच संपणार आहे. पालखी तेवढी आडगावला जाईल. नाशिकमध्येच राहणाऱ्या माजी संमेलनाध्यक्षांना कशी ऐनवेळी पत्रिका पोचती करण्यात आली, याची रंगतदार चर्चा संमेलनस्थळी अजनूही रंगत आहे. वादांची पडछायाही अधूनमधून मंडपात डोकावतच असते.  एकूणच काय तर, ध्येयवादी प्रीतीचे भव्योदात्त कल्पनाचित्र ज्यांनी आपल्या संपन्न शब्दकळेने मूर्तिमंत केले त्या कुसुमाग्रजांच्या कर्मभूमीत हे संमेलन होतेय, असे पहिल्या दिवसाचे तरी चित्र नक्कीच नाही. संमेलनात झगमगणारे हे ‘दूरचे दिवे’ कितीही लोभस वाटत असले तरी त्यांची प्रकाशकिरणे तात्यासाहेबांचा वारसा सांगणाऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचतील का, हा खरा प्रश्न आहे. मध्ये उभी ठाकलेली आणि राजकीय कारणांनी निर्माण झालेली ‘आडगावी अलिप्तता’ त्यांच्या मार्गात अडसर ठरण्याची शक्यता अधिक आहे.