संमेलन स्थळाचे अंतर कमी करण्यासाठी उड्डाण पुलाचा आधार

३ ते ५ डिसेंबर या काळात मराठी साहित्य संमेलन आडगावस्थित मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे होत आहे

अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक :  ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवीन स्थळ आणि शहरातील विविध भाग यातील अंतर कमी करण्यासाठी संयोजकांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलाचा अधिक वापर करण्याची तयारी केली आहे. संमेलनात येणाऱ्या अतिविशेष व्यक्तींची उड्डाण पुलालगतच्या हॉटेलमध्ये निवास व्यवस्था केली जाईल. नाशिककर आणि बाहेरगावाहून आलेल्या साहित्यप्रेमींना शहरात हात दाखवा आणि बस थांबवा या उपक्रमातून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यातील निम्म्या बस उड्डाण पुलावरून मार्गक्रमण करतील. जेणेकरून साहित्यप्रेमींना संमेलन स्थळी सहज, सुलभपणे ये-जा करता येणार आहे.

३ ते ५ डिसेंबर या काळात मराठी साहित्य संमेलन आडगावस्थित मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे होत आहे. याआधी संमेलनासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील जागेची निवड झाली होती. स्थळ बदलताना आयोजकांनी अधिकाधिक पायाभूत सुविधा असलेल्या जागेचा विचार करून संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या शैक्षणिक संकुलावर शिक्कामोर्तब केले. यामागे आधुनिक सुविधांनी सज्ज विविध सभागृह, हिरवाईने नटलेला विस्तीर्ण परिसर, मैदान, वाहनतळासाठी मुबलक जागा आदींमुळे कमी वेळात संमेलनाचे नेटके नियोजन करता येईल, असा विचार आहे. मध्यवर्ती भागापासून संमेलन स्थळ १० ते १२ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे साहित्य प्रेमींचा हिरमोड होऊ नये म्हणूुन आयोजकांनी जय्यत तयारी केली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात संमेलन स्थळ आहे. महामार्गावरील उड्डाण पुलाचा वापर केल्यास शहरातील वाहतूक कोंडी टळते आणि अंतरही लक्षात येत नाही. खुद्द स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी मुंबईहून शहरात प्रवेश करताना गरवारे चौकातील उड्डाण पुलावरून वाहन नेल्यास संमेलन स्थळी येण्यास केवळ १० मिनिटे लागतात, असा दाखला दिला आहे.

आयोजकांनी उड्डाण पुलाच्या वापरातून संमेलन स्थळाचे अंतर कमी करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. संमेलनात अंदाजे ४० अतिविशेष व्यक्ती सहभागी होतील. त्यांच्यासाठी उड्डाण पुलालगतची हॉटेल शोधली जात आहेत. संबंधितांची अशा हॉटेलांमध्ये निवास व्यवस्था केल्यास त्यांची वाहने उड्डाण पुलावरून सहजपणे ये-जा करतील. संमेलनात सहभागी होणाऱ्या नाशिककरांनी वैयक्तिक वाहनाऐवजी आयोजकांनी उपलब्ध केलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन सर्व समित्यांचे प्रमुख विश्वास ठाकूर यांनी केले आहे.

साहित्यप्रेमींसाठी १५० बसगाडय़ांचा ताफा शहरातील वेगवेगळ्या भागातील तसेच बाहेरगावहून येणाऱ्या साहित्यप्रेमींची संमेलन स्थळी ने-आण करण्यासाठी १५० बसगाडय़ांचा ताफा सज्ज राहणार आहे. शिवाय ५० बस अतिरिक्त स्वरूपात ठेवण्यात येणार आहेत. संमेलनात सहभागी होणाऱ्या व्यक्तींना बसप्रवास मोफत असेल. संमेलन काळात हात दाखवा, बस थांबवा हा उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी १४ मार्ग निश्चित करण्यात आले असून कुठल्याही भागातून नागरिक संमेलनात सहजपणे ये-जा करू शकतील. यातील निम्म्या बससाठी उड्डाण पुलाचा वापर केला जाणार आहे. अतिविशेष व्यक्तींकरिता अंदाजे ४० वाहनांचे प्राथमिक नियोजन करण्यात आल्याचे संमेलनाच्या परिवहन (वाहतूक) व्यवस्था समितीचे प्रमुख मंदार देशमुख यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 94th akhil bharatiya marathi sahitya sammelan met bhujbal knowledge city zws

Next Story
राज ठाकरेही साधू-महंतांच्या दर्शनार्थ
ताज्या बातम्या