संमेलनाच्या तयारीला स्वागताध्यक्षांच्या संस्थांचे बळ

संमेलनाच्या नियोजनासाठी आधीच स्थापन झालेल्या ४० समित्यांमध्ये ‘एमईटी’ संस्थेतील प्रतिनिधींना नव्याने स्थान देण्यात आले आहे.

तीन ते पाच डिसेंबर या कालावधीत भुजबळ नॉलेज सिटी येथे आयोजन

अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक : येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ बदलल्यामुळे संयोजकांना आता विविध बदल करावे लागत आहेत. संमेलनाच्या नियोजनासाठी आधीच स्थापन झालेल्या ४० समित्यांमध्ये ‘एमईटी’ संस्थेतील प्रतिनिधींना नव्याने स्थान देण्यात आले आहे.

नाशिकचे मराठी साहित्य संमेलन तीन ते पाच डिसेंबर या कालावधीत आडगावस्थित ‘एमईटी’ भुजबळ नॉलेज सिटी येथे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या शिक्षण संस्थेत होत आहे. संमेलनाची तारीख व स्थळ बदलल्यानंतर तयारीला वेग दिला जात आहे. अवघ्या महिनाभराचा कालावधी असल्याने संमेलनासाठी स्थापन झालेल्या ४० समितींचे प्रमुख, उपप्रमुख, गट समन्वयक, पालक पदाधिकारी यांना संमेलन स्थळाची प्रथमच भेट घडविण्यात आली.

संमेलन समन्वयक समीर भुजबळ, ‘एमईटी’ समन्वयक शेफाली भुजबळ आणि सर्व समित्यांचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी भुजबळ नॉलेज सिटीतील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. संमेलनातील विविध कामांच्या नियोजनासाठी आयोजकांनी आधीच ४० समित्यांची स्थापना केलेली आहे. त्यामध्ये तब्बल ८०० हून अधिक जण काम करत आहेत. 

या समित्यांना नव्या संमेलन स्थळी समन्वय साधण्यासाठी ‘एमईटी’तील प्रतिनिधींना प्रत्येक समितीत समन्वयक म्हणून समाविष्ट करण्यात आले. नवनियुक्त प्रतिनिधींना संमेलनातील कार्यक्रमांची रूपरेषा, समितीनिहाय कामाचे स्वरूप, संपर्क क्रमांक आदींची लिखित स्वरूपात माहिती दिली गेली. आडगाव येथील विस्तीर्ण व अलिशान शिक्षण संस्थेत दरवर्षी ‘मेट’ उत्सवाचे आयोजन केले जाते. त्यात चित्रपटसृष्टीतील कलावंत हजेरी लावतात. ‘एमईटी’च्या कर्मचाऱ्यांना भव्यदिव्य सोहळे आयोजनाचा अनुभव आहे. त्याचा लाभ संमेलन यशस्वी करण्यासाठी होईल, असा विश्वास समीर भुजबळ यांनी व्यक्त केला. संमेलन स्थळी विविध संकल्पना राबविल्या जातील. संयोजकांना अभिप्रेत यथाशक्ती मदतीची तयारी एमईटी अर्थात स्वागताध्यक्षांच्या संस्थेने केली आहे.

आठवडय़ातून एकदा आढावा बैठक

नवीन संमेलन स्थळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून १० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे ४० समितींच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी तिथे आठवडय़ातून एकदाच बैठक घेतली जाईल. नियमित बैठकींसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात जागा उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. संमेलनासाठी महाकवी कालिदास कला मंदिरात अतिरिक्त कार्यालय सुरू करण्यात आले. बैठकांसाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे.

संयोजकांचा भार हलका शहर व संमेलन स्थळ यात बरेच अंतर असल्याने काही अडचणी येऊ शकतात. शहरातील कार्यालयातून समित्यांमार्फत नियोजन होईल. तर संमेलन स्थळी ‘एमईटी’तील त्या त्या समित्यांचे समन्वयक प्रत्यक्षात तयारीचे व्यवस्थापन करतील. संमेलनात १५ ते २० हजार जण सहभागी होण्याचा अंदाज आहे. त्यासाठीची तयारी व यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी अडीच ते तीन हजार जण कार्यरत असतील. ‘एमईटी’तील पायाभूत सुविधा व मनुष्यबळावर संमेलनाचे शिवधनुष्य पेलण्यावर संयोजकांचा भर आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 94th akhil bharatiya marathi sahitya sammelan organized at met bhujbal knowledge city zws

ताज्या बातम्या