|| अनिकेत साठे

समितीनिहाय ४० रंगीत पेहराव अन् गटनिहाय फिती

नाशिक: येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची घटिका जशी समीप येत आहे, तसे लग्नघराप्रमाणे लगबग सुरू झाली आहे. संमेलनात देशासह राज्यातून हजारो साहित्यप्रेमी सहभागी होण्याचा अंदाज आहे. गर्दीत संमेलनाचे शिवधनुष्य पेलणाऱ्या ४० समित्यांचे पदाधिकारी आणि सदस्य चटकन ओळखता यावेत म्हणून प्रत्येक समितीला वेगवेगळ्या रंगाचे पोशाख निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. काही समित्या संमेलनासाठी खास पोशाख शिवण्याच्या तयारीला लागल्या आहेत. परस्परांशी निगडित कामांवर आधारित सर्व समित्यांचे एकूण नऊ गट आहेत. त्यांना गटनिहाय विशिष्ट रंगाच्या फिती देण्यात येणार आहेत.

बऱ्याच अडचणींनंतर नाशिकच्या साहित्य संमेलनास ३ ते ५ डिसेंबरचा मुहूर्त लाभला आहे. कविता वाचन, गझल अशा कार्यक्रमांद्वारे वातावरण निर्मिती होत आहे, शनिवारी संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींच्या उपस्थितीत झाला.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने व लसीकरणाचे प्रमाणही वाढल्याने संमेलनास साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता गृहीत धरून ४० समित्यांमार्फत जय्यत तयारी सुरू आहे. 

अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि अतिथी समितीचे प्रमुख डॉ. सुधीर संकलेचा यांनी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, समिती प्रमुख व सदस्य, स्वयंसेवक अशा वेगवेगळ्या व्यक्तींसाठी विशिष्ट रंगाचे ओळखपत्र, फीत देण्याची सूचना केली होती. अशी ओळख न दिल्यास आयोजकांना संमेलनस्थळी स्थानिक व निमंत्रितांना ओळखणे अवघड होणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. संयोजकांनी प्रत्येक समितीला आपापल्या पोषाखांसाठी रंग निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. काही समित्यांचे सदस्य तर विशिष्ट रंगात खास पोषाख तयार करवून घेणार असल्याचे सर्व समित्यांचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर यांनी सांगितले. ४० समित्यांची परस्परांशी निगडित कामांवर नऊ गटात विभागणी करण्यात आली आहे. या प्रत्येक गटास वेगवेगळ्या रंगांची फीत दिली जाईल. जेणेकरून समित्यांमधील सदस्य परस्परांना लक्षात येतील.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी विशिष्ट रंगाची फीत असणार नाही. त्यांची संख्या मर्यादित आहे. त्यांना सहजपणे ओळखता येईल. त्यांच्या भोजनासाठी व्यवस्था वेगळी राहणार असल्याचे संयोजकांकडून  सांगण्यात आले. 

नियोजन असे…

प्रत्येक समितीची प्रमुख, उपप्रमुख व १० ते २० सदस्य अशी रचना आहे. त्यांच्यामार्फत ग्रंथप्रदर्शन, ग्रंर्थंदडी, मंडप व्यासपीठ, प्रवेशद्वार दालन उभारणी, ध्वनियंत्रणा व प्रकाशयोजना, भोजन, आरोग्य व वाहतूक व्यवस्था आदी विषयांवर स्वतंत्रपणे नियोजनाला अंतिम स्वरूप दिले जात आहे.

वेगळे ठरण्यासाठी…

आतापर्यंतच्या संमेलनापेक्षा हे संमेलन वेगळे ठरावे, यासाठी संयोजकांनी कंबर कसली आहे.  समित्यांमधील पदाधिकारी आणि सक्रिय सदस्यांची संख्या ६०० ते ७०० च्या घरात आहे. संमेलनकाळात होणाऱ्या गर्दीत त्यांना ओळखण्यासाठी विशिष्ट रंगाचा गणवेश आणि फीत असा पर्याय धुंडाळण्यात आला आहे.